पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली, आता कधी होणार?

नवी दिल्ली : प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणीआधीच कोर्टाने या खटल्याला पुढची तारीख दिली. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी पुढील दि. २३ जानेवारी, शुक्रवारी होणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज होणा-या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
कारण या निकालाचे परिणाम महापालिकेतील सत्ता समीकरणावरही होणार होती. परंतु ही अंतिम सुनावणी पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरे यांना पुन्हा झटका बसला आहे. ही सुनावणी आज होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आज सकाळीच वकिल असीम सरोदे यांनी दिली होती.
असीम सरोदे म्हणाले, दुपारी एक वाजेपर्यंतच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नियमित कोर्टातील कामकाज केले. कारण दुपारी एक वाजल्यापासून सरन्यायधीश आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज केले. त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.





