प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १) रात्री एमआयडीसी भोसरी येथे इंद्रायणी नगर रस्त्यावर इफिशिएंट इंजिनिअर्स कंपनीसमोर घडली.विकासकुमार संजय सेठ (वय ३४, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. २) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक लेलँड टेम्पो (एमएस १४ एलएक्स १६६२) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा मोहित विकासकुमार सेठ आणि त्याचा मित्र प्रियांशु अरुण शर्मा हे दुचाकीवरून इंद्रायणी नगर रस्त्यावरून जात असताना, समोरून आलेल्या भरधाव टेम्पोचालकाने वाहतुकीचे नियम धुडकावून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र प्रियांशु शर्मा गंभीर जखमी झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.