प्रभात वृत्तसेवा पिंपरी – नाशिक फाटा येथे शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातानंतर ऑडी कार जळून खाक झाली. या अपघातात कारचालक जखमी झाला असून आणखी किती जण कारमध्ये होते याची माहिती मिळू शकली नाही. दोन दिवसांपूर्वीही ट्रकवर कार आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता.अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेचार वाजता एमएच १४ एलपी ०९९९ क्रमांकाची ऑडी कार वेगाने जात असताना पुढे असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडकली. धडकेनंतर कारला अचानक आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली.घटनास्थळी तातडीने अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. दलाच्या जवानांनी कारला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली. अपघाताचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलीस व अग्निशामक दलाकडून पुढील तपास सुरू आहे.