Pimple Gurav: विसर्जनाच्या पहिल्याच दिवशी दापोडी-कासारवाडीतील हौदांची दुर्दशा
Pimple Gurav : कासारवाडी येथील गणेश विसर्जन हौदांच्या दूरवस्थेचे चित्र समोर

पिंपळे गुरव – गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनास सुरुवात झाली असून दापोडी येथील पवना घाट तसेच कासारवाडी येथील गणेश विसर्जन हौदांच्या दूरवस्थेचे चित्र समोर आले आहे.
या दोन्ही ठिकाणी विसर्जन हौदांची पाहणी केली असता हौदांना तडे गेलेले असून काही ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. पाण्याने भरलेल्या हौदातच तडे बुजविण्याचे काम सुरू असल्याने पालिका प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दापोडी पवना घाट व कासारवाडी येथे हजारो गणेशभक्त विसर्जनासाठी येतात. मात्र, विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था, अपुरी प्रकाशव्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महिला भाविक व विसर्जनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच विसर्जन हौदांची स्वच्छता, दुरुस्ती व सुरक्षितता तपासणे अपेक्षित होते. मात्र, उत्सव सुरू झाल्यानंतर हौदात पाणी भरलेले असतानाच तडे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाकडून विसर्जनाचे नियोजन नेमके किती गांभीर्याने करण्यात आले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, आरोग्य निरीक्षक सचिन जाधव, आरोग्य मुकादम घोलप, कांबळे आदी उपस्थित होते.
आगामी पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून विसर्जनस्थळे सुरक्षित व सुस्थितीत ठेवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Pune District : बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याच्या आजारांची साथ




