Ganeshotsav : ‘ दैनिक प्रभात’ कार्यालयात बाप्पा विराजमान; विधीवत प्राणप्रतिष्ठा, चैतन्यमय वातावरण
Ganeshotsav : राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार

पिंपरी – वर्षभर बातम्यांच्या धावपळीत, शब्दांच्या विश्वात आणि शहराच्या घडामोडींवर परखड काम करणाऱ्या दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात सोमवारी (दि. १४) लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पा विराजमान होताच कार्यालयातील वातावरणही आनंद आणि उत्साहाने भारावून गेले.
दैनिक प्रभात परिवाराच्या वतीने दरवर्षी कार्यालयात बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो. कार्यालयातील कर्मचारी, पत्रकार आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत बाप्पाचे स्वागत केले. नेहमी बातम्यांच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी धावणाऱ्या ‘प्रभात’ परिवाराला या निमित्ताने काही क्षण एकत्र येण्याची आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मिळाली.
गणरायाच्या आगमनासाठी कार्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विधिवत प्रतिष्ठापनेनंतर आरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी सुख, समृद्धी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली. ‘बाप्पा, वर्षभर आमच्यासोबत राहा आणि चांगले काम करण्याची शक्ती दे,’ अशी मनोमन भावना प्रत्येकाच्या मनात होती.
गणेशोत्सवाच्या पुढील दहा दिवसांत दैनिक प्रभात कार्यालयात भक्तिमय वातावरण कायम राहणार आहे. या कालावधीत शहरातील आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, विविध पदाधिकारी, कायदे तज्ञ तसेच सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दररोज आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिवसभर शहरातील घडामोडी टिपणाऱ्या ‘प्रभात’ कार्यालयात पुढील दहा दिवस बातम्यांसोबत बाप्पाच्या भक्तीचाही सुगंध दरवळणार आहे. गणरायाच्या उपस्थितीने कार्यालयातील वातावरणात उत्साह निर्माण झाला असून, दहा दिवसांचा हा भक्तिमय सोहळा ‘प्रभात’ परिवारासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.





