Ganeshotsav 2026: डीजे बंदीचा धसका, काही ढोल-ताशांचा पथकाकडून अडवणूक
Ganeshotsav 2026: आगाऊ बुकिंग घेऊनही मोठ्या मंडळांसाठी पथके फिरविल्याच्या तक्रारी; मागणी वाढताच मानधन दुप्पट-तिप्पट; राजकीय दबावाचीही चर्चा

पिंपरी – डीजेच्या दणदणाटाला लगाम घालण्याची पोलिसांची भूमिका आणि कारवाईच्या धास्तीमुळे यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर साजरा करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. मात्र, डीजेला पर्याय म्हणून पुढे आलेल्या ढोल-ताशा पथकांभोवतीच आता पैशांचा ‘खेळ’ रंगल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
आगाऊ पैसे घेऊन बुकिंग निश्चित करायचे आणि ऐनवेळी अधिक पैसे देणारे मंडळ मिळाले की जुनी बुकिंग रद्द करायची, अशा प्रकारांमुळे गणेश मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
डीजेवर कारवाईची शक्यता लक्षात घेऊन अनेक मंडळांनी डीजेचे आधीच केलेले बुकिंग रद्द केले आहे. काही मंडळांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कमही दिली होती. मात्र, आता पारंपरिक ढोल-ताशा पथकांची मागणी वाढल्याने या पथकांच्या मानधनात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी पूर्वी ठरलेल्या दराच्या तुलनेत दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट रक्कम मागितली जात असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.
‘मोठी सुपारी’ मिळताच हात झटकले?
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मंडळे अनेक आठवडे आधीपासून तयारी करतात. ढोल-ताशा पथकांशी संपर्क साधून तारीख आणि वेळ निश्चित केली जाते. त्यासाठी आगाऊ रक्कमही दिली जाते. मात्र, आता मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मंडळांकडून अधिक मानधनाची लालूच दाखविण्यात येत असल्याने काही ढोल ताशा पथके आधीचे करार पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
‘तुमचे बुकिंग रद्द झाले’, ‘वादक उपलब्ध नाहीत’, ‘पथकाची संख्या कमी आहे’, अशी विविध कारणे सांगून ऐनवेळी माघार घेतली जात असल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. परिणामी, आधीच नियोजन केलेल्या छोट्या-मध्यम मंडळांना शेवटच्या क्षणी दुसरे पथक शोधण्याची धावपळ करावी लागत आहे.
छोट्या मंडळांवर दबावाचा आरोप
या प्रकाराला आता राजकीय हस्तक्षेपाची किनार लागल्याची चर्चा गणेश मंडळांच्या वर्तुळात सुरू आहे. मोठ्या मंडळांना पथके मिळावीत यासाठी काही छोट्या मंडळांनी केलेले बुकिंग सोडावे, यासाठी राजकीय वजनाचा वापर होत असल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे. फोनवरून दबाव आणला जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.
परंपरेच्या नावाखाली पैशांचा बाजार?
ढोल-ताशा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. गणेशोत्सवात त्याला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे डीजेच्या वाढत्या आवाजाला पर्याय म्हणून ढोल-ताशांकडे पाहिले जात आहे. मात्र, त्याच परंपरेचे व्यापारीकरण होत असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मागणी वाढली म्हणून दर वाढविणे हा व्यावसायिक व्यवहाराचा भाग असू शकतो.
परंतु आगाऊ पैसे घेऊन बुकिंग निश्चित केल्यानंतर अधिक पैसे देणाऱ्या मंडळासाठी जुनी ऑर्डर रद्द करणे हा नैतिकतेचा प्रश्न असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या खर्चात आणखी भर पडत आहे. वर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या पैशातून मंडळांना वाढीव मानधन द्यावे लागत असल्याने त्याचा थेट भार सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे.
वाद वाढले; उत्सवातील सलोख्यालाच तडा
बुकिंग रद्द झाल्याने काही ठिकाणी मंडळांचे पदाधिकारी आणि पथक प्रमुख यांच्यात जोरदार वाद झाल्याच्या तक्रारी आहेत. ‘आमची बुकिंग रद्द करत असाल, तर पर्यायी पथक उपलब्ध करून द्या’, अशी भूमिका मंडळांकडून घेतली जात आहे. ऐन उत्सवाच्या काळात पर्यायी पथक मिळणे कठीण असल्याने या वादाला आणखी धार येत आहे.
एकीकडे डीजेवर कारवाईची टांगती तलवार, दुसरीकडे ढोल-ताशा पथकांचे वाढते दर आणि त्यातच बुकिंगवरून निर्माण होणारे वाद, अशा तिहेरी कोंडीत गणेश मंडळे सापडली आहेत. बाप्पाच्या उत्सवात भक्तीचा गजर होणार की पैशांच्या ‘सुपारी’ची बोली लागणार? या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासन आणि संबंधित ढोल-ताशा पथकांनी देण्याची वेळ आली आहे.
‘आमच्या चिंचवडचा राजा मंडळाने काही महिने आधीच ढाेल ताशा पथक बुक केले होते. आता त्यांचा फोन येत आहे की आम्ही तुमची सुपारी रद्द करीत आहोत. ऐनवेळी आम्हाला दुसरे पथक कोठून मिळणार. आम्ही बुक केलेल्या पथकाची सुपारी रद्द करण्यासाठी पुण्यातील एका माजी आमदाराचाही फोन आला आहे.’- महेश मिरजकर, चिंचवडचा राजा मित्र मंडळ
Pune District : विघ्नहर्त्याने दुष्काळाचे विघ्न दूर करावे; हर्षवर्धन पाटलांचे श्रीगणरायाला साकडे





