Leopard captured : पिंपरखेडमध्ये आठ वर्षीय नर बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास
Leopard captured : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दोन महिन्यांपासून दहशत निर्माण करणारा आठ वर्षीय नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद. माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी.

Leopard captured (जांबूत) : पुणे जिल्ह्यातील बिबटप्रवण हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांची दहशत कायम आहे. पिंपरखेड येथील पारगाव रस्ता परिसरात मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आठ वर्षीय नर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले.
सोमवारी (दि. १८) रात्री आठच्या सुमारास शेतकरी विश्राम जानकू चव्हाण यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या भक्षाच्या शोधात अडकला.
पारगाव रस्ता ते मधला मळा आणि दाभाडेमळा वस्ती परिसरात या बिबट्याने पाळीव जनावरांसह अनेक श्वानांचा फडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बिबट्याला पकडण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून वनविभागाकडून परिसरात पिंजरे लावून प्रयत्न सुरू होते. मात्र भक्षाच्या शोधात येणारा बिबट्या वारंवार पिंजऱ्याला हुलकावणी देत होता, अशी माहिती वनकर्मचारी महेंद्र दाते यांनी दिली.
अखेर सोमवारी रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले. ही माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
मात्र, मागील महिनाभरापासून या भागात बिबट्यांची वाढती संख्या ही ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा
पिंपरखेड आणि परिसर बिबटप्रवण क्षेत्र म्हणून घोषित आहे. मागील सात महिन्यांतील घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभाग या भागात सतर्कतेने काम करत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच बेस कॅम्प जवानांच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
नागरिकांनी बेसावध न राहता लहान मुले व शालेय विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी. तसेच परिसरातील बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून काही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक जुन्नर, स्मिता राजहंस यांनी केले आहे.





