आर्थर रोड तुरुंगातील ‘ती’ खास खोली मेहुल चोक्सीसाठी सज्ज!

नवी दिल्ली : परदेशात पलायन केलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेल्जियम न्यायालयाने चोक्सीचे राजकीय छळवणूक आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप फेटाळल्यामुळे, त्याचे भारतात प्रत्यार्पण आता निश्चित झाले आहे. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात चोक्सीला ठेवण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील आरोपी असलेल्या चोक्सीला ठेवण्यासाठी आर्थर रोड तुरुंगातील बॅरक क्रमांक १२ निश्चित करण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणांनी बेल्जियम कोर्टात या बॅरकचे फोटो आणि सुविधांचे सादरीकरण केले होते. चोक्सीने भारतातील तुरुंग स्थिती आणि जीवाला धोका असल्याचे कारण देत प्रत्यार्पणाला विरोध केला होता, म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आले.
जवळपास ४६.५ चौरस मीटर (५०० चौरस फूट) आकाराची ही बॅरक अलीकडेच सुधारित केली गेली असून ती आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुरूप असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले.
या खास बॅरकमध्ये मुख्य खोली, स्वच्छतागृह, हवेशीर खिडक्या, लोखंडी ग्रीलचे दरवाजे, मच्छरदाणी आणि सततच्या देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाईल जॅमरची सोय आहे. चोक्सीला सुरक्षित आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुविधा असलेल्या कोठडीत ठेवले जाईल, असे भारताने परदेशी न्यायालयांना वारंवार आश्वासन दिले आहे.





