Shirur : जांबूतच्या उपसरपंचपदी फिरोदिया यांची बिनविरोध निवड
Shirur : ग्रामपंचायतीच्या एकूण दहा सदस्यांपैकी आठ सदस्य या निवडणूक प्रक्रियेस उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी पोपटलाल नेनसुख फिरोदिया यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

शिरूर : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील महत्त्वपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या लक्षवेधी असलेल्या जांबूत येथील उपसरपंचपदी पोपटलाल नेनसुख फिरोदिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंचपदाची धुरा आता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे गावच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
जांबूत ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच राणीताई बोऱ्हाडे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच गोरक्ष गजानन गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी संतोष भाऊ गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
ग्रामपंचायतीच्या एकूण दहा सदस्यांपैकी आठ सदस्य या निवडणूक प्रक्रियेस उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी पोपटलाल नेनसुख फिरोदिया यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी सरपंच गोरक्ष गाजरे, नवनिर्वाचित माजी उपसरपंच राणीताई बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष रामचंद्र जगताप, राहुल रावसाहेब जगताप, सुप्रिया ज्ञानेश्वर जगताप, रेखा दिलीप खुपटे, दीपाली दुडे, सोसायटीचे चेअरमन आनंदराव जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब पठारे, बबन किसन गाजरे, माजी संचालक सुरेश चौधरी, अर्जुन शेठ सपाते आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पोपटलाल फिरोदिया यांचे ग्रामस्थ, पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावाच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आव्हान आता नवनिर्वाचित उपसरपंचांसमोर असणार आहे.
निवडीतून समन्वयाचे चित्र
जांबूत हे बेट भागातील महत्त्वाचे गाव असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, मूलभूत सुविधा, ग्रामस्थांच्या समस्या आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध प्रश्नांवर नव्या उपसरपंचांकडून विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बिनविरोध निवडीमुळे गावातील लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचे वातावरण असल्याचेही या निवडणुकीतून दिसून आले.





