Phaltan ST Depot: फलटण एसटी बसस्थानकाचा होणार कायापालट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मोठी घोषणा
Phaltan ST Depot: फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतुकीची गरज ओळखून टप्प्याटप्प्याने नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार.

Phaltan ST Depot – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फलटणच्या एसटी आगाराला भेट देऊन, कामकाजाचा आढावा घेतला. शिवसेनेचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणीला प्रतिसाद देत फलटण बसस्थानक विकसित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आधुनिक प्रवासी सुविधा, प्रशस्त प्रतीक्षालय, व्यापारी गाळे, पार्किंग, स्वच्छतागृहे, डिजिटल माहिती प्रणाली आणि इतर अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्यात येणार आहे.
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलमुळे एसटी महामंडळाला नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल, तर प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधीही मिळणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. फलटण आगाराला 25 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 17 आणि दुसर्या टप्प्यात उर्वरित बसेस देण्याची घोषणा त्यांनी स्पष्ट केली.
फलटण तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि ग्रामीण भागातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन, एसटी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा मिळेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. सरनाईक यांनी आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकार्यांशी चर्चा करून, अडचणी जाणून घेतल्या.
एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम व प्रवासीकेंद्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, माजी सदस्य दत्ता अनपट, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





