Phaltan Panchayat Samiti – फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपाच्या शिवांजली विक्रम भोसले यांची तर उपसभापतिपदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नाईक निंबाळकर गटात मनोमिलन दिसून आले. भाजपने तीस वर्षानंतर सत्तांतर घडवत प्रथमच पंचायत समितीवर सभापतीपदाचा झेंडा फडकविला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक फलटण पंचायत समिती च्या 16 जागांपैकी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी युतीला 8 तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 8 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे सभापती उपसभापती निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. दोन्ही गटाचे प्रत्येकी आठ सदस्य निवडून आल्यामुळे महिनाभर सहलीला गेलेले होते. आज ते थेट सभागृहात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौं प्रियांका आंबेकर यांनी सभापती उपसभापती निवड प्रक्रियेची माहिती दिली. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सभापतिपदासाठी शिवांजली भोसले यांचा तर उपसभापतिसाठी अमोल सस्ते यांचा अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्या. निवडणुकीपूर्वी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी शिवसेनेचे नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीमध्ये सभापती भाजप-राष्ट्रवादी युतीचा तर उपसभापती शिवसेनेचा असा निर्णय घेण्यात आला. सकाळी 11 नंतर सर्व सदस्य एकत्र पंचायत समिती सभागृहात आले यावेळी पंचायत समितीच्या बाहेर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,माजी आमदार दीपक चव्हाण नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या तिन्ही सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश आज सकाळी मोठ्या नाटकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच तीनही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवांजली विक्रम भोसले यांचे सभापतिपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर सभापती शिवांजली भोसले यांचा सत्कार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात यापुढे विकास कामे होतील जनतेच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू व त्या पद्धतीने विकास कामे केली जातील, अशी ग्वाही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.