जनता विकासकामांना प्राधान्य देईल – आमदार मोहिते पाटील

राजगुरुनगर – निवडणुकीच्या रिंगणात अनेक चेहरे उभे असले तरी, जनता फक्त विकास कामांना प्राधान्य देईल, असा विश्वास दिलीप मोहिते पाटील यांनी सायगाव (ता. खेड) येथे व्यक्त केला. खेड तालुक्यातील जनतेचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी २४ तास सेवेत राहून शाश्वत विकास कामे करणाऱ्या आमदार मोहिते पाटील यांच्या मागे सर्वच ग्रामस्थ उभे राहणार, असा निर्धार सायगाव, रानमळा, रौंधळवाडी, कोहिंडे, तळवडे अहिरे, पराळे आणि तोरणे बुद्रुक गावे आणि परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.
प्रचाराच्या विविध माध्यमांचा वापर करून जनसंवाद दौरे आणि कोपरा सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांमधून जनतेच्या सहभागाला मोठा महत्त्व दिले जात आहे. लोकांना त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं आहे. प्रचारात फक्त विकास कामांचे मुद्दे उभे राहतात, असेही मोहिते पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हधाले, खेड तालुक्यात रस्ते, साकव, पूल, तीर्थक्षेत्रांचा विकास आणि पाणी योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा ठसा जनतेवर राहिला आहे. या सर्व कामांमुळे जनतेत त्यांचे समर्थन वाढले आहे. आणि प्रत्येक गावात त्यांच्या कामांची प्रशंसा होत आहे. सकारात्मक दृष्टीकोनामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीचा भाव दिसून येतो आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा गावभेट दौरा शुक्रवारी (दि.१) रोजी सायगाव, रानमळा, रौंधळवाडी, कोहिंडे, तळवडे अहिरे, पराळे आणि तोरणे बुद्रुक आदी गावात झाला. यावेळी त्यांनी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. सायगाव येथे कोपरा बैठक झाली. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिपच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे, संचालक जयसिंग भोगाडे,सुरेश शिंदे, विनायक घुमटकर यांच्यासाह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





