नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महायुती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत. ऐनवेळी त्यांचे मंत्रीमंडळातून नाव कट केल्याने त्यांचे समर्थकदेखील आक्रमक झाले आहेत. यादरम्यान आज छगन भुजबळ यांनी येवल्यात आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या भेटीत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख करत एक मोठा गौप्यस्फोट केला. काय म्हणाले छगन भुजबळ ? “ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार. कोणाविषयी दुष्मनी विसरून जा. आरक्षणाचा भुलभूईय्या संपणार आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले. “काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही. मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काही वाद नाही. मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो, आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका. तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो”, असा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी यावेळी केला. अजित पवारांना लगावला टोला “इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळचा बळी घेणार का? मी 2 वर्षांनी जाणार असं बोललो. मी काही लल्लू-पंजू आहे का? चर्चा सुद्धा नाही केली की कोण मंत्री होणार. माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे? तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का? काय तर म्हणे दादाचा वादा. हा लढा मंत्रिपदाचा नाही. लढा अपमानाचा आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वैगेरे मानत नाही. ही लोकशाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आग्रह केला होता की काहीही करून भुजबळांना मंत्री करा. पण ऐकलं नाही. कारण हे सर्वांपेक्षा जास्त हुशार, जास्त शहाणे”, असा टोला छगन भुजबळ यांनी अजित पवारांना लगावला.