Sachin Pilgaonkar : “मुंबईपेक्षा पुण्यातील लोकांनी मराठी जोपासली आहे..”; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत
मुंबईपेक्षा पुण्यात मराठी चित्रपट जास्त चालतात. याचं कारण म्हणजे मुंबईपेक्षा पुण्यातील लोकांनी मराठी भाषा अधिक जोपासली आहे', असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Sachin Pilgaonkar : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले; मात्र आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने आणि स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी काही मोजकीच नावं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेते ‘सचिन पिळगावकर’
बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचला आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या बेधडक स्वभावामुळे आणि स्पष्ट मतांमुळे सचिन पिळगावकर अनेकदा चर्चेत असतात.
आता पुन्हा एकदा त्यांच्या विधानाची मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी थेट मुंबई आणि पुण्यातील मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांची तुलना केली आहे. ‘मुंबईपेक्षा पुण्यात मराठी चित्रपट जास्त चालतात. याचं कारण म्हणजे मुंबईपेक्षा पुण्यातील लोकांनी मराठी भाषा अधिक जोपासली आहे’, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टी, प्रेक्षकांची आवड आणि मराठी भाषेच्या जतनाबाबत आपली मतं मांडली. ते म्हणाले, “एवढं मात्र नक्की की, मुंबईपेक्षा जास्त चित्रपट पुण्यात चालतो. त्याचं मूळ कारण म्हणजे मुंबईपेक्षा जास्त पुण्यातल्या लोकांनी मराठी जोपासली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.
मुंबई म्हणालात तर इतर भाषासुद्धा महत्त्वाच्या आहेत. मराठी नाही असं आपण म्हणू शकत नाही. मुंबईमध्ये सुद्धा उत्तम चित्रपटांचा चांगला बिझनेस होतो. नाही असं नाही.” असं ते म्हणाले.
केवळ मराठी भाषा म्हणजे मराठी चित्रपट नव्हे!
यावेळी सचिन पिळगावकर यांनी मराठी चित्रपटांच्या आशयावरही महत्त्वाचं भाष्य केलं. त्यांच्या मते, एखादा चित्रपट केवळ मराठी भाषेत आहे म्हणून त्याला खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट म्हणता येणार नाही. त्या चित्रपटाच्या कथेत, व्यक्तिरेखांमध्ये, संवादांमध्ये आणि एकूणच आशयामध्ये मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब दिसणं आवश्यक आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, “पूर्वी बघावं लागायचं नाही, पण आता बघावं लागतं की त्यात किती मराठीपण आहे. तुम्ही पुणे, मुंबई, कोल्हापूर म्हणताय, मी तर त्याच्याहून दुसरीकडे जाऊन म्हणतोय की, ते तर आहेच; पण त्या आधी बघा चित्रपट मराठी आहे की नाही.
फक्त भाषाच मराठी असली की, त्याला आपण मराठी सिनेमा कसा म्हणायचा? त्याचा गाभा मराठी पाहिजे. मराठी चित्रपट पाहत असताना प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की, हा मराठी सिनेमा आहे. त्यामुळे तुम्ही मराठीपण टिकवू शकता. या सिनेसृष्टीत असे काही फिल्ममेकर्स आहेत, ज्यांनी मराठीपण टिकवून ठेवलं आहे.” असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.






