Devendra Fadnavis : “टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर” – मुख्यमंत्री फडणवीस
या प्रकल्पामुळे राज्यात दरवर्षी सुमारे ९ लाख ३६ हजार तपासण्या करण्याची क्षमता निर्माण होईल. त्यातून अंदाजे १ लाख १२ हजार क्षयरुग्ण आणि ४ हजार ६८० रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरुग्ण लवकर ओळखता येतील.

Devendra Fadnavis – क्षयरोगाचे जलद व अचूक निदान करून टीबीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागांतील नागरिकांनाही जलद व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी ३०० अत्याधुनिक ट्रूनॅट क्वात्रो आण्विक निदान यंत्रे बसविण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यभर प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हास्तरीय आरोग्य संस्थांमध्ये ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या या आधुनिक यंत्रांमुळे क्षयरोगाचे लवकर आणि अचूक निदान करणे शक्य होणार आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, सुमारे ४१.९२ कोटी रुपये खर्चाच्या आणि २१ महिने कालावधीच्या या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाउंडेशन, एचआयटीईएस–एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेड ही कार्यान्वयन संस्था आणि सहसंचालक, आरोग्य सेवा (क्षयरोग व कुष्ठरोग) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागांतही आधुनिक निदान सुविधांचा विस्तार होईल.
ट्रूनॅट क्वात्रो यंत्रांद्वारे अवघ्या एका तासात क्षयरोगासह रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरोगाचे निदान करता येणार आहे. ही यंत्रे पोर्टेबल आणि बॅटरीवर चालणारी असल्यामुळे दुर्गम भागांतही त्यांचा सहज वापर करता येईल. यंत्रे हाताळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, निक्षय प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण कामकाजाचे डिजिटल निरीक्षण केले जाणार आहे.
या प्रकल्पामुळे राज्यात दरवर्षी सुमारे ९ लाख ३६ हजार तपासण्या करण्याची क्षमता निर्माण होईल. त्यातून अंदाजे १ लाख १२ हजार क्षयरुग्ण आणि ४ हजार ६८० रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरुग्ण लवकर ओळखता येतील. निदानातील विलंब कमी झाल्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल तसेच ग्रामीण व वंचित भागांतील नागरिकांना सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा मिळेल.





