“लोकांना भीक मागण्याची सवय झाली आहे…”; ‘त्या’ नेत्याच्या विधानामुळे खळबळ

Election 2025 – आता लोकांना सरकारकडून भीक मागण्याची सवय लागली आहे. नेते येतात आणि त्यांना मागणी पत्रांनी भरलेली टोपली दिली जाते. ही चांगली सवय नाही. घेण्याऐवजी देण्याची मानसिकता विकसित करा.
मी तुम्हाला खात्री देतो की, तुम्ही आनंदी व्हाल आणि एक सुसंस्कृत समाज निर्माण कराल. भिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे म्हणजे समाज मजबूत करणे नव्हे तर तो कमकुवत करणे आहे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले आहे.
ज्या सर्वसामान्य मतदारांच्या मतांवर निवडून येऊन तुम्ही मंत्री बनता, त्यांनाच भिक्षेकरी अशी उपमा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राजगड जिल्ह्यातील मुथालिया येथे अवंतीबाई लोधी यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पटेल यांनी सगळाच ताळतंत्र सोडल्याचे दिसले.
आपल्या भाषणात पटेल असेही म्हणाले की, मोफत वस्तूंकडे आकर्षित होणे म्हणजे शूर महिलांचा आदर करणे नव्हे. समाजाला बळकटी देण्यासाठी लोकांना स्वावलंबी व्हावे लागेल. मोफत वस्तूंकडे जितके आकर्षण असेल तितकी ता समाजाला कमकुवत करण्याची मानसिकता आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी पटेल यांच्यावर टीका करताना म्हटले की, त्यांचे वक्तव्य राज्यातील लोकांचा अपमान आहे. भाजपचा अहंकार इतका वाढला आहे की, त्यांनी आता जनतेला भिकारी म्हणायला सुरुवात केली आहे. अडचणींना तोंड देणाऱ्या लोकांच्या आशा आणि अश्रूंचा हा अपमान आहे.
ते निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देतात आणि नंतर ती पूर्ण करण्यास नकार देतात. जेव्हा जनता त्यांना आठवण करून देते तेव्हा ते निर्लज्जपणे त्यांना भिकारी म्हणतात! त्यांनी लक्षात ठेवावे – लवकरच हेच भाजप नेते मते मागायला येतील! त्यावेळी आपण आपला इंगा दाखवून देऊ.





