Nagar | स्नेहलता कोल्हे अभावी मतदारसंघात शांतता

कोपरगाव, {शंकर दुपारगुडे} – कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीतून भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आपल्या राजकीय भवितव्याचा विचार न करता निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने कोपरगाव तालुक्यात स्मशान शांतता पसरली आहे.
काळे-कोल्हे तालुक्यातील मातब्बर नेते आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नसणारे हे दोन घराणे राज्यात एकमेव असावेत. त्यांचा स्वतंत्र मतदारांचा गठ्ठा कायम त्यांच्या सोबत आहे. आजपर्यंत कोपरगाव मतदार संघात काळे-कोल्हे या दोघांचा बोलबाला आहे.
काळे-कोल्हे यांचा राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला परिचित आहे. या मतदार संघात काळे विरुध्द कोल्हे असा संघर्ष कायम असतो, मात्र अचानक कोल्हे यांनी यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आमदार आशुतोष काळे यांच्या आमदारकीचा मार्ग सुखकर झाला आहे.
अचानक कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची चर्चा जशी सुरु झाली तशी तिसर्या फळीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांची आमदार होण्याची इच्छा प्रबळ झाली.
काहींना दिवसा आमदारकीचे स्वप्न पडू लागले. काहींनी आमदारकीच्या निवडणुकीत स्वत:उतरुन पाडापाडी करण्याचा डाव आखला होता पण कोल्हे निवडणुकीत नसल्याने तो डाव त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केवळ कोल्हेंना पाडण्यासाठी निवडणुकीची तयारी केले होते.आता तेच तोंडघुसी पडले आहेत. मतदारसंघात काळे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने काळे यांना हि निवडणूक म्हणजे काही खुशी कही गम अशी झाली आहे.
टिका करण्यासारखा सक्षम विरोधी उमेदवार नाही. काळेंनी कोल्हे विरूध्द लढण्याची सर्व तयारी मुद्द्यानिशी केली, पण कोल्हे उमेदवारी करीत नसल्याने आता कोणाला तोंड द्यायचे याचे चित्र अजूनही अस्पष्ट आहे.
सध्या कोल्हे रिंगणात नसल्याचा काहींना आनंद झाला तर बहुतांश मतदारांना व कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना दुःख झाले. कोल्हे निवडणुकीत उतरणार नसल्याने आता निष्ठावंत म्हणून वावरणार्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची सुवर्ण संधी आहे की काय असे वाटते.
मतदार संघाची निवडणूक कोल्हे शिवाय होणार हे ऐकूण अनेकांची मती गुंग झाली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यकर्त्यांत कमालीची शांतता पसरली आहे. कोल्हे यांची भूमिका शेवटच्या क्षणी काय असेल. कोल्हे आता शांत बसल्याने कोणती लाट तालुक्यात निर्माण होवू शकते.
मतदार त्याचा कोणाला फटका देतील? कोल्हे विना हलक्यात होणारी ही निवडणूक खरचं काळेंना सोपी असेल का? आता तालुक्यातील तिसरा तुल्यबळ कोण असणार, गेल्या विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांना यावेळी अधिक संधी निर्माण झाल्याने निष्ठावंताची प्रतिष्ठा उजळ करता येईल.
कोल्हे या निवडणुकीतून माघार घेतल्याने अनेकांचे अर्थचक्र उलटे फिरण्याची शक्यता दाट आहे.मतदारांना कोल्हे कसे चुकीचे होते,हे पटवून देणारे आता काळे यांच्या विरोधात उतरणार की काळेंना सहकार्य करणार.
आमदार आशुतोष काळेंनी विक्रमी निधी आणुन मतदारसंघात विकास केला. हे पाच वर्षे ज्यांनी आपल्या भाषणातून सांगितला ते आज काळे विरूध्द काय बोलणार? काळेंच्या प्रयत्नातून झालेला विकास अचानक अमान्य करणार काय? केवळ कोल्हे निवडणुकीतून माघार घेतल्याने या निवडणुकीची दिशा बदलली आहे तर काहींची दशा झाली आहे. कार्यकर्ते हातावर घडी तोंडावर बोट अशा अवस्थेत बसले आहेत.
काहीही झाले तरी काळे कोल्हे शिवाय मतदारसंघाच्या निवडणुकीला रंगत नाही अशी चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.
कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने नागरीक कोल्हेंबद्दल सहनुभुतीने बोलुन लागले आहेत. कोल्हेंची ही राजकीय खेळी अनेकांना विचार करायला आणि बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे.
आज होणार भूमिका स्पष्ट
कोल्हे परिवार प्रथमच विधानसभा निवडणुकीतून बाहेर पडल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक चर्चा सुरु झाल्याने बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी कोल्हे परिवार आपली भूमिका जाहीर करणार आहे.
बुधवारी कोपरगावचे राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोल्हेविना निवडणुकीला खरा रंगत घडणार आहे.





