PCMC Water Cut: आता रात्री गजर लावून जागे राहा! पालिकेच्या ‘या’ निर्णयामुळे नागरिकांची झोप उडाली
PCMC Water Cut: महापालिकेने १५ टक्के पाणीकपातीची अंमलबजावणी करताना शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठ्याच्या वेळा बदलल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप.

PCMC Water Cut – पिंपरी-चिंचवड महापालिकेने १५ टक्के पाणीकपातीची अंमलबजावणी करताना शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठ्याच्या वेळाच बदलल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. काही भागात मध्यरात्री, काही ठिकाणी पहाटे तर काही परिसरात दुपारच्या वेळेत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होणार आहे. पाणीकपात मान्य असली, तरी अवेळी पाणीपुरवठा कोणत्या निकषावर केला जात आहे,
असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने पावसाने ओढ दिल्याने धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण देत शहरात १५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, कपात करताना केवळ पाण्याचा कालावधी कमी करण्याऐवजी अनेक भागांतील वेळाच बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, वास्तू उद्योग आणि उद्यमनगर परिसरात मध्यरात्री एक वाजता पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नवी सांगवीतील गणेशनगर, समर्थनगर आणि टन्नू शाळा परिसरात पहाटे साडेचार ते साडेसहा या वेळेत पाणी दिले जाणार आहे. तर तानाजीनगरमध्ये दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. या बदलामुळे प्रत्येक भागातील नागरिकांचे दैनंदिन नियोजन कोलमडले आहे.
रात्री पाणी भरण्यासाठी जागरण करावे लागत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. आता मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक नळकोंडाळ्यावरील भांडण ऐकायला मिळणार आहे. पहाटेच्या वेळेमुळे महिलांची झोपमोड होत आहे. दुपारच्या वेळेमुळे नोकरी करणाऱ्या कुटुंबांसमोर वेगळीच अडचण निर्माण झाली आहे.
घरात कोणी नसल्यास पाणी भरणार कोण, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. नागरिकांचा आक्षेप केवळ पाणीकपातीवर नाही, तर निर्णयाच्या पद्धतीवर आहे. एवढा मोठा बदल करण्यापूर्वी नागरिक, गृहनिर्माण संस्था किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी कोणताही संवाद साधण्यात आला नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळा बदलण्यामागील कारणांबाबत महापालिकेकडून स्पष्ट भूमिका मांडली गेलेली नसल्याने संभ्रम वाढला आहे.






