Water Purity: पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! टँकरचे पाणी पिताय? महापालिकेचा अत्यंत महत्त्वाचा इशारा
Water Purity: खासगी टँकरच्या पाणीपुरवठ्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही; नागरिकांना भूमिगत टाक्या बांधण्याचे मुख्य अभियंत्यांचे आवाहन.

Water Purity – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना व आंद्रा धरण परिसरात देखील अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या आणि दैनंदिन वापरासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, ते पाणी शुद्ध नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहे.
शहरामध्ये गेल्या साडेसहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याने मान्सून उशिराने शहरात दाखल झाला. पावसाला सुरूवात झाली असली तरी अद्याप जोरदार पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणक्षेत्रामध्ये अद्याप ओढे-नाले भरून वाहिले नाही. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली नाही. उपलब्ध पाणीसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरविण्याचे मोठे आवाहन जलसंपदा विभागापुढे आहे.
त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला पिण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये १५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे पवना धरणामधून आता ५५० नव्हे तर ४६७ एमएलडी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाण्याच्या वेळेत बदल केला आहे. ज्याठिकाणी एक तास पाणी सोडले जात होते. तिथे आता पाऊण तासच पाणी सोडले जाते. त्यामुळे अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
परिणामी, अनेक सोसायट्यांना टँकरची संख्या वाढविण्याची वेळ आली आहे. मात्र, टँकरच्या पाण्याबाबत अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत. टँकरचालक पाणी कुठून भरतात? ते पाणी किती शुद्ध असते? हे तपासणारी यंत्रणा नाही. तसेच त्यावर महापालिका प्रशासनाचे देखील कोणतेही नियंत्रण नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. टँकरमधून येणारे पाणी हे नेहमीच अधिकृत स्त्रोतांमधून भरलेले असेलच असे नाही.
काही वेळा अशुद्ध किंवा तपासणी न केलेले पाणीही पुरवले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी विकत घेताना त्याची गुणवत्ता, स्त्रोत आणि पुरवठादाराची माहिती तपासून घ्यावी. तसेच शक्य असल्यास पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच वापरावे, अशीही सूचना देण्यात आली आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, संसर्गजन्य आजार वाढण्याचा धोका असल्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर लॉबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओटीपी यंत्रणा बंधनकारक केली होती. कोणत्या भागात किती टँकर? एका सोसयटीमध्ये कितीवेळा फेऱ्या? यासह पाणी कुठून भरले याबाबतची माहिती मिळणार होती. मात्र, त्या आदेशाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा करत शहरात टँकरलॉबी विस्तारली आहे.
“खासगी टँकरच्या पाणीपुरवठ्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. नागिरकांनी पाणी घेत असताना त्याची शुद्धता तपासावी. तसेच नागरिकांनी भूमिगत टाक्या बांधण्याची आवश्यकता आहे. पाणीटंचाई हे संकट असून त्याला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी देखील महापालिका प्रशासनाला मदत करणे आवश्यक आहे.”
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता.






