PCMC Transfers : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खात्यांत फेरबदल ; जाणून घ्या कोणाकडे कोणत्या विभागाची जबाबदारी

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तसेच, सहाय्यक आयुक्त व क्षेत्रीय अधिकार्यांच्या विभाग व जबाबदारीत बदल करण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त (क्रमांक १) प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे निवडणूक व जनगणना विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे.निवडणूक व जनगणना हा विभाग अतिरिक्त आयुक्त (क्रमांक २) विजयकुमार खोराटे यांच्याकडे होता. लवकरच महापालिका निवडणूक होणार आहेत. त्यामुळे या विभागाचे महत्व वाढले आहे. हा महत्वाचा विभाग अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
सहाय्यक आयुक्त अमित पंडीत यांच्याकडे आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभाग कायम ठेवण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्याकडील ब क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काढून ड क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त राजाराम सरगर यांच्याकडील वैद्यकीय मुख्य कार्यालयाची जबाबदारी काढून ब क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे यांच्याकडील क क्षेत्रीय मुख्यालय काढून झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग देण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडील समाज विकास विभाग काढून त्यांना आपत्ती व्यवस्थापन व अभिलेख कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त राजीव घुले यांच्याकडून कर संकलन मुख्य कार्यालय काढून स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभाग सोपविण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्याकडील अभिलेख कक्षाचा अतिरिक्त कार्यभार निरस्त करण्यात आला आहे. तसेच, उपायुक्त सीताराम बहुरे यांच्याकडील एलबीटी विभागाची अतिरिक्त कार्यभार निरस्त केला आहे.





