PCMC Schools: महापालिकेचा अजब कारभार! १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तकच नाही; संदीप वाघेरे आक्रमक
PCMC Schools: आकांक्षा फाउंडेशन व महापालिकेच्या संयुक्त शाळांमध्ये दोन वर्षांपासून पुस्तकांचा तुटवडा; संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन.

PCMC Schools – नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे. तरीही अजून पिंपरी-चिंचवड महापालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सुमारे १,२८० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची व संबंधित दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापालिका व आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून सन २०१३ पासून कै.अनुसया नामदेव वाघेरे, कै. दत्तोबा रामचंद्र काळे आणि पीसीएमसी बोपखेल इंग्लिश मीडियम शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. या शाळांनी सातत्याने दहावीचा १०० टक्के निकाल राखत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही शाळांकडून वेळेत मागणी करूनही पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी संबंधित विभागाला तातडीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, तसेच वेळेत पुरवठा न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा या शाळांचा उद्देश आहे. मात्र, वेळेत पाठ्यपुस्तके न मिळणे ही गंभीर बाब असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दोषींवर कारवाई करावी.”
– संदीप वाघेरे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका




