PCMC Nominated Member : भाजपला नक्की कोणाची भीती? ‘या’ फायरब्रँड महिलेला रोखण्यासाठी भाजपचा मोठा गेम
PCMC Nominated Member : राष्ट्रवादीचं एक नाव बदलण्याच्या नादात भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांची नावेही रखडली; कालावधी कमी होत असल्याने भाजपमध्येच धुसफूस.

PCMC Nominated Member – महापालिकेतील विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकृत पदासाठी दिलेल्या नावांमधून एक नाव बदलण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी चक्क फेरप्रस्ताव सादर करण्याची विनंती राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्यांना केली असल्याचे समोर आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधून पराभूत झालेल्या सीमा सावळे यांना स्वीकृत पदावर संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.
त्यांचे नाव बदलण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे. सोमवारी (दि. २०) महापालिका सभा तहकूब झाल्याने हा विषय आणखी लांबणीवर गेला आहे. महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजपकडून ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून ३ जणांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या सभेत याबाबत निर्णय अपेक्षित होता.
मात्र, सत्ताधारी पक्षाने आपली नावे सादर न करता मुदतवाढ घेतली. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करण्याबाबत विषय विषयपत्रिकेत आला, मात्र, भाजपाने नावे सादर न केल्याने हा विषय तहकूब करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा हा विषय विषयपत्रिकेवर घेण्यात आला. स्वीकृत पदावर निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जणांची नावे सादर केली आहे.
त्यासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने तीन अर्ज सादर करण्यात आले. त्यामध्ये सीमा सावळे, फजल शेख आणि राजेंद्र जगताप यांचा समावेश आहे. या तीनही अर्जांची प्रशासनाने छाननी केली. त्यामध्ये तीन ही अर्ज वैध असल्याचे समोर आले. त्यामुळे सभेत फक्त या नावांवर शिक्कामोर्तब करण्याचे बाकी आहे. मात्र, भाजपाने त्यांच्या सात सदस्यांची नावे न देता राष्ट्रवादीतील एक नाव बदलण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत.
सीमा सावळे या पूर्वी भाजपमध्ये होत्या. त्यांनी २०१७ मध्ये निवडून आल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले. महापालिकेतील फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. आताच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. सत्तेत असतानाही त्यांनी भाजपच्या अनेक गोष्टींना विरोध केला. आता तर राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत विरोधात आहे.
त्यामुळे सीमा सावळे पुन्हा सभागृहात आल्या तर सत्ताधारी भाजपच्या अनेक प्रकरणांवर त्या रान उठवतील अशी भीती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आहे. त्यासाठीच सावळे यांना रोखण्यासाठी भाजपने गेल्या दोन महिन्यांपासून हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, अर्ज सादर करून तो वैध ठरला असल्याने भाजपाची गोची झाली आहे. परिणामी, हा विषय सातत्याने लांबणीवर टाकला जात आहे.
सोमवारची सभा तहकूब करण्यात आली. मात्र, सभा तहकूब झाली नसती तरी स्वीकृत पदावर निवड करण्याचा विषय तहकूबच करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपच्या पूर्व बैठकीत झाला होता. त्यामुळे काहीही करून नाव बदलत नाही तोपर्यंत हा विषय तहकूब करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
आमची पण टीम तुम्हीच ठरवणार का?
यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाव बदल किंवा फेर प्रस्ताव सादर करण्यास तीव्र विरोध करण्यात आला. राष्ट्रवादीची आलेली तीनही नावे ही वरिष्ठांकडून आली आहेत. पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी स्वतः या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाव बदलणार नाही असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आमची टीम देखील तुम्हीच ठरवणार असाल तर सामन्याला काय अर्थ आहे असा टोला देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.







