PCMC News : प्रभाग एकीकडे, फलक दुसरीकडे! पालिकेचा अजब कारभार; कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी उधळपट्टी?
PCMC News : उपमहापौर शर्मिला बाबर आणि नगरसेवक अमित गावडे यांच्या नावाचे बोर्ड दुसऱ्याच प्रभागात; थरमॅक्स चौक परिसरातील प्रकाराने नागरिक चक्रावले.

PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांचे नामफलक त्यांच्या प्रभागात लावण्यात येत आहेत. मात्र, प्रभागाच्या बाहेर नामफलक लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. महापालिका प्रशासनाच्या या उधळपट्टीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुका मुदतीमध्ये न झाल्याने १२ मार्च २०२२ ला महापालिका बरखास्त झाली. महापालिकेत आयुक्तांच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार १३ मार्चपासून सुरू झाला.
ती प्रशासकीर राजवट ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू होती. महापौर रवी लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांची निवड ६ फेब्रुवारीला झाली. तेव्हापासून महापालिकेत नगरसेवकांच्या माध्यमातून कारभार सुरू झाला. त्यानंतर सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेता, गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष तसेच, विविध विषय समितीचे सभापती निवडण्यात आले. तेव्हापासून महापालिकेचा कारभार पदाधिकारी व नगरसेवकांच्या माध्यमातून सुरळीत सुरू आहे.
पदाधिकारी व नगरसेवकांच्या प्रभागात संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून त्यांचे नामफलक लावले जातात. पदाधिकारी व नगरसेवकांचे घर आणि संपर्क कार्यालयाजवळ हे फलक लावले जातात. नागरिकांना नगरसेवकांचे घर किंवा संपर्क कार्यालय विनाअडथळा सापडावे म्हणून महापालिकेकडून ते फलक लावले जातात. पदाधिकारी व नगरसेवकांचे नामफलक शहरभरात दृष्टीस पडत आहेत.
एका एका पदाधिकार्यांचे १० ते १५ नामफलक प्रभागात लावल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रभागाच्या बाहेरही नामफलक लावल्याचे दिसून येत आहे. उपमहापौर शर्मिला बाबर तसेच, नगरसेवक अमित गावडे यांचा निगडी, प्राधिकरण, आकुर्डी गावठाण प्रभाग क्रमांक १५ आहे. त्यांच्या प्रभागात त्यांच्यासह नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ यांचे नामफलक लावण्यात आले आहेत.
मात्र, उपमहापौर बाबर व नगरसेवक गावडे यांच्या नावाचे नामफलक संभाजीनगर, चिंचवड येथील थरमॅक्स चौक परिसरात लावण्यात आले आहेत. एकाच रस्त्यावर तीन तीन फलक लावण्यता आले आहे. त्या प्रभागाशी त्या नगरसेवकांचा संबंध नसताना तेथे नामफलक लावून उधळपट्टी केली जात असल्याचे दिसून येत आहे. बिलाची रक्कम वाढविण्यासाठी ठेकेदारांकडून नको त्या प्रभागातही नामफलक लावण्यात आले आहेत. या प्रकारावरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.






