Cockroach Janta Party : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’ची एंट्री; रावेतमधील ‘त्या’ पोस्टर्सनी उडवली खळबळ
Cockroach Janta Party : सोसायटी सुरक्षा आणि पोलीस पडताळणीवरून रावेतात हायव्होल्टेज ड्रामा; हातात माईक घेतलेल्या 'कॉकरोच' कार्टूनने वेधले सर्वांचे लक्ष.

Cockroach Janta Party – देशभरात चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीची आता पिंपरी-चिंचवडमध्येही एंट्री झाल्याने शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. रावेत परिसरात झळकलेल्या पोस्टरमुळे अनधिकृत भाडेकरू, सोसायट्यांमधील सुरक्षा प्रश्न आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांमध्येही याबाबत मतमतांतरे उमटत आहेत.
रावेतमधील अनधिकृत भाडेकरूंना पोलिसांचे अभय? असा थेट सवाल पोस्टरमधून करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, सोसायटी पदाधिकारी आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोस्टरमध्ये कॉकरोचचे प्रतीक वापरत जनतेचा आवाज असा संदेश देण्यात आला आहे. हातात माईक आणि व्यवस्थेकडे बोट दाखवणारा कार्टून कॅरेक्टर वापरून थेट प्रशासनावर निशाणा साधण्यात आला आहे.
पोस्टरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अनधिकृत भाडेकरूंमुळे अनेक सोसायट्यांमध्ये गर्दी, पार्किंगचा गोंधळ, पाणी-वीज वापरावर अतिरिक्त ताण, वाढते मेंटेनन्स खर्च आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. भाडेकरू कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, पोलिस व्हेरिफिकेशन झाले आहे का? असे सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
तसेच, तक्रार करूनही कारवाई होत नाही, उलट तक्रारदारांनाच सुनावले जाते, अशी ओळ पोस्टरमध्ये झळकली असून ती सर्वाधिक चर्चेत आली आहे. अनेक सोसायटी पदाधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना भाडेकरूंच्या पोलिस पडताळणीबाबत प्रशासन उदासीन असल्याची भावना व्यक्त केली. पोस्टरची भाषा, डिझाइन आणि संदेश अत्यंत आक्रमक असल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. काहींनी या मोहिमेला जनतेचा दबलेला आवाज म्हटले आहे,
तर काहींनी हा प्रकार विशिष्ट वर्गाला लक्ष्य करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले आहे. रावेत, ताथवडे, पुनावळे आणि हिंजवडीसारख्या आयटी पार्कलगतच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाडेकरू वास्तव्यास असल्याने हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे. त्यामुळे या पोस्टर मोहिमेमागे एखादा सामाजिक गट आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय जमीन तयार करण्याचा प्रयत्न, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.
रावेत बदलेल, व्यवस्था सुधारेल
पोस्टरमध्ये रावेत बदलेल, व्यवस्था सुधरेल अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ सोशल मीडिया ट्रेंड न राहता आगामी काळात स्थानिक राजकारणातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कॉकरोच जनता पार्टीची ही पोस्टर मोहीम रावेतसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चेचा विषय बनली असून, प्रशासन याची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






