PCMC News: महापालिकेच्या कामाच्या फाइल्स चक्क ठेकेदारांच्या घरी? १५० कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र
PCMC News: अधिकाऱ्यांच्या खुर्चीभोवती ठेकेदारांचा दिनभर राबता; फाईल गहाळ झाल्यास थेट संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

PCMC News – महापालिकेतील प्रशासकीय शिस्त आणि गोपनीयता धोक्यात आली असून कामकाजाच्या फाइल्स चक्क ठेकेदार, एजंट घरी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेत बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य विभागात अनेक फाइल्स थेट ठेकेदार, एजंट, आर्किटेक्ट, सल्लागार हाताळत आहे. कामकाजात त्यांची ढवळाढवळ सुरु असल्याची तक्रार १५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
हा हस्तक्षेप थांबविण्याचे विनवणी या कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेत प्रशासकीय शिस्त व कामकाजासाठी नियमानुसार फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात किंवा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेण्याची जबाबदारी वर्ग ४ कर्मचारी (शिपाई) यांची असते. मात्र, अलिकडे महालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरील ठेकेदार, एजंट, आर्किटेक्ट, सल्लागार किंवा त्यांचे खासगी कर्मचारी फाइल्स घेऊन वावरतात.
ते फाइल्स महापालिकेच्या बाहेर घेऊन जात असल्याचे दिसते. हा गंभीर प्रकार सुरु असतना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई किंवा दक्षता घेतली जात नाही. मात्र, १५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा विषय चर्चेत आला आहे. कर्मचाऱ्यांनी या निवेदनात एक उदाहरण दिले आहे. स्थापत्य विभागातील एक फाइल एका ठेकेदाराने स्वतःच्या ताब्यात घेऊन ती थेट पाणीपुरवठा विभागात नेऊन ठेवली.
मात्र, आश्चर्य म्हणजे या संपूर्ण प्रकारात फाईल गायब झाल्याची टांगती तलवार आणि जबाबदारी मात्र वर्ग-४ कर्मचाऱ्यावर टाकण्यात आली. या अशा प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एखादी फाइल गहाळ किंवा हरवल्यास त्याचा थेट दोष वर्ग-४ कर्मचाऱ्यांवर ठेवला जातो. त्यांच्यावर नोटीस, दंड किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वरिष्ठ अधिकारीच स्वतः ठेकेदारांना फाइल्स ने-आण करण्यास सांगतात.
तसेच, काही अधिकारी तर फाईली थेट पालिकेबाहेर देऊन, त्यावरील शासकीय टिपण्या किंवा दुरुस्त्या एजंटांकडूनच करून घेत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. फाइल्स ठेकेदार, बिल्डर, एजंट, आर्किटेक्टच्या हातात देण्यास मनाई करावी, फाइल गहाळ झाल्यास शिपाई कर्मचाऱ्यांऐवजी थेट अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
अधिकाऱ्यांच्या केबिनवर एजंटांचा मुक्त वावर
महापालिकेचे अधिकारी केबिनमध्ये असोत वा नसोत, ठेकेदार आणि एजंट दिवसभर अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या अवतीभवती ठाण मांडून बसलेले असतात. सुरक्षारक्षकांना हे माहीत असूनही ते हतबल आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांच्या निवेदनानंतर महापालिकेला कारभार चर्चेत आला असून या आरोपांची दखल घेत आयुक्त काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे.
आमदारांच्या पीएची ढवळाढवळ
शहरातील एका आमदाराची स्वीय सहायक सातत्याने महापालिकेच्या विविध विभागांत ठाण मांडून बसलेले असतात. अनेक फाइल्स हे महाशय स्वतः घेऊन जातात. कामांच्या फाइल्स तयार करून आणणे, त्यावर अधिकाऱ्यांना दमदाटी करत सह्या करायला लावल्याचे प्रकार देखील समोर येत आहे. मात्र, राजकीय दबावापोटी अधिकारी देखील सहन करत आहेत.






