PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांकडून अनेक उपसूचना मंजूर करण्यात आल्या आहेत. चिंचवड येथील सिटी सेंटरसाठी राखीव असलेल्या चिंचवड येथील जागेत अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात यावे, यासह विविध उपसूचना मंजूर करण्यात आल्या आहेत. सायन्स पार्क समोर नवीन महापालिका भवनासमोर महापालिकेची जागा आहे. त्या खाणीच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिटी सेंटर हे व्यापारी संकुल उभारण्याचा इरादा दरवर्षी अंदाजपत्रकात केला जातो. नियोजित सिटी सेंटरच्या जागेत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याची उपसूचना सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांनी मंजुर केली. त्या प्रस्तावाला सूचक अनुराधा गोरखे तर अनुमोदक कुशाग्र कदम हे आहेत. तसेच, सांगवी-बोपोडी हा मुळा नदीवर पुल बांधण्यात आला आहे. त्यासाठी ६० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र, त्या पुलाकडे जाणारे सांगवीतील अंतर्गत रस्ते हे खूपच अरुंद आहेत. त्यामुळे त्या पुलाचा पुरेसा वापर होत नसल्याचे चित्र आहे. रस्ते विकास ( संग्रहित फोटो ) नव्या पुलास सांगवी परिसरातील मुळा नदीच्या बाजूने तसेच, शिवसृष्टी उद्यान येथे रस्ता १८ मीटर रुंद करणे, ही उपसूचना मंजूर करण्यात आली आहे. त्या उपसूचनेला जोडून आणखी एक उपसूचना मंजूर करण्यात आली आहे. पवनानगर, काळेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ८८,९०,९१ व ९६ येथील उद्यानाचे आरक्षण (क्रमांक ६३९) आहे. हे आरक्षण निवासी क्षेत्रात समाविष्ट करून उद्यानाचे आरक्षण रद्द करण्याची उपसूचना सभेत मंजूर करण्यात आली आहे. निगडी, प्राधिकरण येथील यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्यासाठी यशवंतराव चव्हाण समितीला १ कोटी रुपयाचे अनुदान देणे. महापालिकेत स्थापत्य विभागाच्या कनिष्ठ अभियंता या पदाची अर्हता व अनुभवामध्ये सुसुत्रता आणून ते पद पदान्नतीने भरणे, या उपसूचनांनाही सभेत मान्यता देण्यात आली आहे. नामकरणांच्याही उपसूचना पिंपळे गुरव येथील सर्व्हे क्रमांक ८२ व ८१ मध्ये १२ मीटर व १८ मीटर रुंद रस्ते विकसित करण्यासाठी संबंधित जागामालकास नुकसान भरपाई देणे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहातील दोन स्क्रीन सुरू करून सभेचे लाईव्ह चित्रीकरण करणे. दापोडी ते पिंपरी मेट्रो मार्गावर आकर्षक खांब उभारून सुशोभिकरण न करता सांगवी फाटा येथील महात्मा फुले उड्डाण पुल येथे रोषणाई करणे. सांगवी-बोपोडी पुलास सरकार शितोळे सेतू असे नामकरण करणे. पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौकास गोविंद यशदा चौक असे नामकरण करणे. रहाटणी येथील प्राथमिक शाळेस नारायण नढे असे नामकरण करणे.