Satara News : प्रशासनाच्या दिरंगाईचा संताप! पालकमंत्र्यांच्या घरासमोर दिव्यांगांचा आत्मदहनाचा इशारा
Satara News : विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष; दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचा संताप निवेदनातून व्यक्त.
Updated On:

Satara News – दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर येथील दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्यावतीने निवेदने देऊनही, जिल्हा प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पोवई नाका येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ‘कोयना दौलत’ निवासस्थानासमोर आज, दि. 14 रोजी सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिला आहे. याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्वांत पारदर्शक कामकाज करत असलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्यात यावी.
आमदार निधी व इतर खर्चाचा तपशील जनतेसमोर जाहीर करावा. दिव्यांगांसाठी राखीव निधीच्या खर्चामध्ये पारदर्शकता आणावी. दिव्यांग विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी शाळांकडून दिला जाणारा त्रास बंद व्हावा. दिव्यांगांसाठी जागा वाटपाचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावेत. एसटी बसस्थानकांवर दिव्यांगांना प्राधान्य दिले जावे. शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प, व्हीलचेअर व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या मागण्यांसाठी अनेक वेळा निवेदने देऊनही, कार्यवाही केली जात नसल्याने, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यात येईल.





