PCMC Garden – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड येथे मुळा नदी काठावर संत सावता माळी उद्यान विकसित केले आहे. मात्र, हे उद्यान सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लहान मुलांसाठी खास उभारण्यात आलेल्या या उद्यानामध्ये विविध आकर्षक खेळणी बसविण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच त्यापैकी अनेक खेळणी तुटलेली असून काही ठिकाणी धोकादायक अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे परिसरातील चिमुकल्यांची गैरसोय होत असून पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाकड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या वाढल्याने येथे लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. शाळेनंतर किंवा सायंकाळच्या वेळेत मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित आणि सुसज्ज जागा मिळावी या उद्देशाने महापालिकेने मुळा नदीकाठावर हे उद्यान विकसित केले. सुरुवातीला घसरगुंडी, झोपाळे, सी-सॉ, क्लायंबिंग स्ट्रक्चर यांसारखी आधुनिक खेळणी बसविण्यात आली होती. त्यामुळे हे उद्यान परिसरातील कुटुंबांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले होते. मात्र, सध्या या उद्यानातील अनेक खेळण्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही झोपाळ्यांच्या साखळ्या तुटल्या आहेत, तर घसरगुंडीचे भाग सैल झाले आहेत. लोखंडी साहित्य गंजल्याचेही दिसून येते. काही खेळण्यांचे प्लास्टिक भाग फुटले असून धारदार कडा उघड्या पडल्या आहेत. अशा अवस्थेत मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी अनेक पालक मुलांना खेळण्यासाठी येथे आणण्यास कचरू लागले आहेत. विशेष म्हणजे, या उद्यानाच्या विकासासाठी आणि खेळणी बसविण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जाते. मात्र एवढा खर्च करूनही अल्पावधीतच खेळणी तुटणे आणि देखभालीचा अभाव जाणवणे याबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. नियमित देखभाल, वेळोवेळी दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना केल्यास चिमुकल्यांना पुन्हा सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्यानांची अवस्था खेदजनक ‘स्मार्ट सिटच्या धर्तीवर वाकडची ओळख ‘स्मार्ट वाकड’ म्हणून निर्माण होत असताना सार्वजनिक उद्यानांची अशी अवस्था असणे खेदजनक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. परिसरातील वाढती लोकसंख्या आणि मुलांची संख्या लक्षात घेता अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि टिकाऊ खेळणी बसविण्याची गरज आहे. तसेच तुटलेल्या साहित्याची तातडीने दुरुस्ती करून नियमित देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.