Pimpri : मुळा नदीकाठी बेकायदेशीर वृक्षतोड

पुरावे असल्याचा वृक्षप्रेमींचा दावा: महापालिका व पोलिसांकडे कारवाईची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पिंपळे निलख परिसरात मुळा नदीकाठी बेकायदेशीर वृक्षतोड आणि मातीचे उत्खनन झाल्याची तक्रार वृक्षप्रेमींनी पुन्हा केली आहे. याबाबत पुरावे उपलब्ध असून महापालिका उद्यान विभाग व पोलिसांकडे कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात दाखल तक्रारीत नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या केंद्रीय अधिकार-प्राप्त समितीच्या निर्देशांचे उल्लंघन मुळा नदीकाठी काम करताना झाले आहे. ही केवळ झाडे तोडण्याची किंवा गाडण्याची बाब नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन असून यामुळे नदीकाठच्या परिसंस्थेच्या समतोलावर थेट परिणाम होत आहे.
मुळा नदीकाठचा पट्टा पुण्याच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जैवविविधतेने समृद्ध आहे, भूजल पुनर्भरणास मदत करतो आणि पूरांपासून नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणून कार्य करतो. या भागाचे होणारे नैसर्गिक नुकसान मानव आणि वन्यजीव दोघांसाठी दीर्घकालीन गंभीर परिणाम घडवू शकतात. त्यामुळे तात्काळ हस्तक्षेप करून ही हानी थांबवावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी चौकशी करावी
उखडून टाकलेल्या पाणजांभूळसारख्या प्रजाती नदीकाठच्या परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा प्रजातींचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन अत्यावश्यक आहे. या नदीकाठच्या वनराईचे रक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांची आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय समितीने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून केंद्रीय समितीच्या निर्देशांचे पालन करावे आणि नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करावे, असेही वृक्षप्रेमींनी म्हटले आहे.





