प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीची तयारी सध्या जोर धरत आहे. सर्वांच्याच नजरा आरक्षणाकडे आहेत. आरक्षणावर बरेच काही ठरणार आहे. यामुळे आरक्षणाच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन अनेक राजकीय नेत्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. अनेक नेत्यांनी आता जनसंपर्कात, बॅनरवर, सोशल मीडियावर आपल्यासोबत आपल्या सौंना देखील स्थान दिले आहे.२०१७ नंतर आता थेट २०२५ च्या शेवटी किंवा २०२६ च्या सुरुवातीला महापालिका निवडणुका होणार आहे. २०१७ साली निवडणुका झाल्यानंतर तत्कालीन नगरसेवकांना आपला पूर्ण कार्यकाळ उपभोगता आला नाही. २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे अनेक मर्यादा आल्या होत्या. अनेक अधिकार थेट अधिकाऱ्यांच्या हाती गेले होते. लाॅकडाऊनमुळे देखील नगरसेवकांना अपेक्षेनुसार काम करता आले नाही. अनेक कामे रखडली होती. त्यानंतर 13 मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागू झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रशासकीय राजवटच आहे. एवढ्या मोठा कालावधी नेते मंडळींना निवडणुकीची वाट पाहत थांबावे लागले. परंतु आता न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका होणारच असल्याने नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. आरक्षण कसे पडेल याबाबत शंका असल्याने ओपन असो वा ओबीसी किंवा महिलांसाठी राखीव तीनही श्रेणींमध्ये निवडणूक लढवून नगरसेवक होण्याचा निर्धार नेत्यांनी केला आहे. आरक्षणामुळे आपल्याला लढता आले नाही तर पत्नीला लढवायचे आणि जर पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर सपत्नीक अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षातून दोघांनीही लढायचे अशी तयारी करण्यात आली आहे. उभयंतांची उपस्थिती.. शहरात सध्या नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम सुरु असून नेते मंडळी या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून सत्कार करुन घेत आहेत. यावेळी मंचावर उभयंतांची उपस्थिती दिसून येत आहे. अनेकांनी आपल्या पत्नीला विविध सामाजिक संस्था सुरु करुन दिल्या आहेत. त्या माध्यमातून महिलांचे कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: नवरात्रीच्या निमित्ताने महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेतले जात आहेत. मोठ-मोठी बक्षीसे दिली जात आहेत. काही अपवादही.. शहरात काही नेते अपवादही आहेत. यांना देखील आरक्षणाची भीती आहे. परंतु त्यांनी आरक्षणानुसार तयारी करण्याएवजी आजू-बाजूच्या दोन तीन प्रभागातसुद्धा तयारी सुरू केली आहे. काही नेत्यांनी आपल्या प्रभागात आरक्षण अडसर ठरल्यास पत्नीला निवडणुकीत उतरविण्याएवजी स्वत: प्रभाग बदलून निवडणूक लढण्याची तयारी देखील केली आहे.