PMC News : भाजपचा ‘गेम’ अन् राष्ट्रवादीची बोळवण! सुनेत्रा पवारांच्या तक्रारीनंतरही दिली केवळ एक जागा
PMC News : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर भाजपने घेतली माघार; नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादीला एक अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय.

PMC News : क्षेत्रीय कार्यालयांची हद्द निश्चित करताना राजकीय डावपेच लढवल्याच्या विरोधात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही राष्ट्रवादीच्या हाती फार काही हाती लागलेले नाही. केवळ एक प्रभाग समिती राष्ट्रवादी काँग्रेसला सोडत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीची बोळवण केली आहे.
महापालिकेत भारतीय जनता पक्षाला एकहाती वर्चस्व मिळाल्यानंतरही १५ मधील तीन प्रभाग समित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जात होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर भाजपने क्षेत्रीय कार्यालयांची हद्द निश्चित करताना केलेल्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या दोन प्रभाग समित्या भाजपकडे जात होत्या. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी भाजपच्या खेळीच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार केली.
त्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी अखेर माघार घेत एक प्रभाग समिती राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली आहे. त्यामुळे आता १३ समित्या भाजपकडे असणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद जाणार आहे. ३२ गावांच्या समावेशानंतर महापालिकेच्या निवडणुका झाल्याने क्षेत्रीय कार्यालयांची हद्द बदलणे क्रमप्राप्त होते.
महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये ही मिनी महापालिका मानली जात असल्याने त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दी निश्चित करताना त्यात हस्तक्षेप केला. या प्रभाग समित्यांची जास्तीत जास्त अध्यक्षपदे आपल्याकडेच राहतील याची खबरदारी घेतली. त्यामुळे, महापालिकेत २७ नगरसेवक निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादीला एकही प्रभाग समिती मिळत नव्हती.
ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित हद्दीत बदल करण्याची मागणी केली. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनीही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या.
मात्र, आयत्यावेळी बदल केल्यास रचनेत भाजपने हस्तक्षेप केल्याचे सिध्द होणार असल्याने भाजपने नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेसला ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद सोडले. या प्रभाग समितीत काँग्रसचे तीन तर भाजप आणि राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही प्रभाग समिती मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.






