Maval News : पंचायत समितीत ‘स्वीकृत’साठी रस्सीखेच! इच्छुकांची मोठी गर्दी; कोणाचं नशीब उघडणार?
Maval News : भाजप-शिवसेनेला सत्तेत वाटा मिळणार का? 'लोणावळा पॅटर्न'च्या चर्चेने मावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ, कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित.

Maval News – निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी रांग लागली होती. आमदार सुनील शेळके यांनी पक्षातील मातब्बर इच्छुकांना पुढील काळात चांगली संधी देऊ, असे आश्वासन देऊन शांत केले होते. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्तीचा मान ठेवत आपले अर्ज मागे घेतले होते. विशेषतः सभापती-उपसभापती निवड झाल्यानंतर स्वीकृत सदस्य पदावर संधी देण्याचे आश्वासन दिले गेले असल्याची चर्चा रंगत आहे.
आता सभापतीपदी सुनीता येवले आणि उपसभापतीपदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर, स्वीकृत सदस्य पदासाठी पुन्हा इच्छुकांची मोठी संख्या समोर आली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर ही डोकेदुखी वाढली असून, पक्षांतर्गत समतोल राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. nमहायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे केले होते.
राष्ट्रवादीने अजित पवार पक्षाने एकतर्फी बाजी मारली, तर भाजपला दारुण पराभव सहन करावा लागला. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने, स्थानिक पातळीवर एकोप्याने काम करण्यासाठी युतीतील इतर पक्षांना स्वीकृत सदस्य पदावर संधी द्यावी, अशी मागणी काही कार्यकर्ते आणि नागरिक करीत आहेत.
पंचायत समितीच्या उपलब्ध स्वीकृत पदांवर महायुतीचे प्रतिनिधी म्हणून भाजप-शिवसेना सदस्यांना मोठ्या मनाने संधी देण्याची चर्चा सुरू आहे. यामुळे तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल आणि राजकीय स्थिरता टिकेल, असे मत मित्रपक्ष व्यक्त करत आहेत. परंतु राष्ट्रवादीतच इच्छुकांची संख्या पाहता मित्रपक्षांच्या अपेक्षांची पूर्तता होणे अवघड दिसत आहे.
‘लोणावळा पॅटर्न’ चीही चर्चा ?
या संदर्भात आमदार सुनील शेळके यांची भूमिका निर्णायक ठरेल. लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केली तरी, त्यांनी उपनगराध्यक्ष पद भाजपला दिले होते. यामुळे महायुतीचा एकत्रित कारभार सुरू झाला आणि ‘लोणावळा पॅटर्न’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हाच पॅटर्न मावळ पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्य पदांसाठी राबवावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून वाढत आहे.
विरोधी पक्षांना संधी देऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या या विजयाला दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीला श्रद्धांजली म्हणूनही पाहिले जात आहे. आमदार शेळके यांनीही विजयानंतर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पुढील काळात स्वीकृत सदस्यांच्या निवडीत पक्षांतर्गत संतुलन आणि महायुतीतील समन्वय कसा साधला जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मावळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) ने फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. पंचायत समितीच्या सर्व १० जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर जिल्हा परिषदेच्या मावळ तालुक्यातील ५ गटांवरही पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. यामुळे ३३ वर्षांनंतर भाजपची सत्ता संपुष्टात आली.
आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखालील या विजयाने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात आला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक इच्छुकांना वेगवेगळी आश्वासने देऊन बंड थंड करण्यात आले होते. परंतु आता ते इच्छुक स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक असल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.






