PCMC BJP Group Leader – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनाची गणिते जुळत असतानाच, गटनेतेपदाच्या नियुक्तीद्वारे भाजपने पुन्हा एकदा जुन्या जाणत्या निष्ठावंताना डावलत निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या नगरसेवकास गटनेते पद बहाल केले. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर पहिले पदच आयात उमेदवाराला दिल्याने जुन्या निष्ठावंतांना डावलण्याची नवी परंपरा सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.नगरसेवकांच्या शुक्रवारी (दि. ३०) झालेल्या बैठकीत प्रशांत कृष्णाराव शितोळे यांची गटनेतेपदी नियुक्ती जाहीर होताच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्र्यांच्या भुवया उंचावल्या. महापालिकेत भाजपाचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आले असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक नगरसेवक गेल्या पंचवार्षिक काळातही भाजपकडून निवडून आले होते. दुसरीकडे, निवडणुकीआधी विविध पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांना थेट उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. प्रशांत शितोळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून सांगवीतील प्रभाग क्रमांक ३२ मधून मोजक्या मतांनी विजय मिळवला. पक्षाच्या अधिकृत पत्रावर प्रदेशाध्यक्षाच्या सहीने एकमताने निवड झाली असल्याचे म्हटले असले तरी अनेक नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रशांत शितोळे “पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या, चढ-उतार पाहिलेल्या नगरसेवकांना डावलून निवडणुकीआधी आलेल्यांना थेट गटनेतेपद देणे योग्य आहे का?” असा सवाल पक्षात उपस्िथत होत आहे. नाराजीची पार्श्वभूमी केवळ नियुक्तीपुरती मर्यादित नाही. भाजप सत्तेत असताना प्रशांत शितोळे यांनी तत्कालीन निर्णयांवर आणि कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका केल्याचेही नगरसेवक आठवण करून देत आहेत. “जे कालपर्यंत पक्षावर आरोप करत होते, ते आज महापालिकेत पक्षाची दिशा ठरवणार का?” असा प्रश्न उपस्िथत केला जात आहे.या नियुक्तीमुळे पक्षनिष्ठा, अनुभव आणि सातत्य या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या पंचवार्षिक काळात भाजपची सत्ता टिकवण्यासाठी झटलेल्या नगरसेवकांना डावलल्याची भावना खोलवर रुजत चालली आहे. “निवडणुकीत मेहनत करणाऱ्यांना डावलून नव्यांना पुढे केल्यास संघटनात्मक बांधिलकी कमजोर होऊ शकते,” असा इशाराही काहींनी दिला. दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून ‘सर्वांना सोबत घेऊनच कामकाज चालवले जाईल’ असा दिलासा दिला जात असला, तरी गटनेतेपदाच्या पहिल्याच निर्णयाने अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान या नियुक्तीबाबत भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. महत्त्वाच्या पदांमध्येही होणार वाटेकरी? पक्षाने निवडणुकीपूर्वी अनेकांना आयात करुन उमेदवारी दिली आणि पक्षचिन्हाच्या व पक्षाच्या खोलवर रुजलेल्या यंत्रणेच्या जोरावर आयात उमेदवार निवडूनही आले. यासाठी अनेक निष्ठावंताना पाच वर्षांसाठी घरी बसावे लागणार आहे. नगरसेवक झाल्यानंतर आता महत्त्वाच्या समित्यांमध्येही पदवाटपात आयातांना प्राधान्य दिल्या जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. दरम्यान पक्षातील काही जुने नगरसेवक महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यावेळी पद मिळाले नाही तरी पुढच्या वर्षी किंवा आगामी पाच वर्षांत पद मिळेल, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांसमोर येऊन ते नाराजी व्यक्त करीत नाही.