Babar Azam : बाबर-रिझवानला पीसीबीचा मोठा धक्का! आशिया कपच्या संघानंतर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये दिला झटका

Babar Azam Moahmmad Rizwan Demoted in Central Contract : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) माजी कर्णधार बाबर आझम आणि सध्याचा वनडे कर्णधार मोहम्मद रिझवानला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आशिया चषक 2025 च्या संघातून वगळल्यानंतर आता पीसीबीच्या 2025-26 साठीच्या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्येही या दोन दिग्गज खेळाडूंना नुकसान सहन करावे लागले आहे.
नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणालाही ग्रेड ए नाही –
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे पाकिस्तानमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पीसीबीच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ग्रेड ए श्रेणीत होते. मात्र, नव्या कॉन्ट्रॅक्ट यादीत त्यांना ग्रेड बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. पीसीबीच्या 2025-26 साठीच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये एकूण 30 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे, परंतु ग्रेड ए श्रेणीत एकाही खेळाडूचा समावेश नाही. पीसीबीने पाच खेळाडूंना बढती देत ग्रेड बी मध्ये समाविष्ट केले आहे.
तसेच गतवर्षी ग्रेड सी मध्ये असलेले अबरार अहमद, हॅरिस रौफ, सलमान अली आगा, सॅम अयूब आणि शादाब खान यांचा समावेश आहे. याशिवाय बोर्डाने 12 नव्या खेळाडूंना कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान दिले आहे. हे खेळाडू आहेत – अहमद दानियाल, फहीम अशरफ, हसन अली, हसन नवाझ, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाझ, साहिबजादा फरहान, सलमान मिर्झा आणि सुफयान मोकिम. हे सर्व खेळाडू प्रथमच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग बनले आहेत.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरीचा फटका –
पाकिस्तान संघाची कामगिरी बऱ्याच कालावधीपासून निराशाजनक राहिली आहे. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला 1-2 असे पराभूत केले. आशिया चषक 2025 पूर्वी पाकिस्तानला युएई आणि अफगानिस्तानसह तिरंगी टी-20 मालिका खेळायची आहे.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 2025-26: खेळाडूंची यादी
- ग्रेड बी (10 खेळाडू): अबरार अहमद, बाबर आझम, फखर जमान, हॅरिस रौफ, हसन अली, मोहम्मद रिझवान, सॅम अयूब, सलमान अली आगा, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी.
- ग्रेड सी (10 खेळाडू): अब्दुल्ला शफीक, फहीम अशरफ, हसन नवाझ, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाझ, नसीम शाह, नोमान अली, साहिबजादा फरहान, साजिद खान, सऊद शकील.
- ग्रेड डी (10 खेळाडू): अहमद दानियाल, हुसैन तलत, खुर्रम शहजाद, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान मिर्जा, शान मसूद, सुफियान मुकीम.





