सायबर सुरक्षेकडे लक्ष द्या; अर्थ मंत्रालयाची व्यावसायिक बँकांना सूचना

नवी दिल्ली – देशात सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढत असल्याबद्दल अर्थ मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे गुन्हे वाढून ग्राहकांचे नुकसान होऊ नये यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपले माहिती तंत्रज्ञान नेटवर्क मजबूत करावे अशी सूचना अर्थ मंत्रालयाने या बँकांना केली आहे.
वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी बँकिंग क्षेत्राचा आणि बँकातील सायबर सिक्युरिटीचा आढावा घेतला. देशात मोबाईलच्या माध्यमातून सायबर फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. सामान्य लोकांचे यामुळे नुकसान होत आहे, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. अशा परिस्थितीत बँकांनी आपल्या ग्राहकांना स्वतःचे संरक्षण कसे करावे या संदर्भात माहिती देण्याची गरज आहे. आपले डिजिटल नेटवर्क अधिक सुरक्षित करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहण्याचे सांगण्यात आले.
डिजिटल बँकिंगमुळे ग्राहकांना आपल्या सेवा वेगात मिळत आहेत. ही समाधानाची बाब आहे. मात्र याचाच दुरुपयोग करून काही गुन्हेगार नागरिकांचे नुकसान करत आहेत. हे नुकसान कमीत कमी होईल अशा पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सायबर गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. बँकांनी आणि ग्राहकांनी सावध राहून व्यवहार केल्यास अशा प्रकारची फसवणूक कमी होऊ शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
देशाच्या सर्व समावेशक विकासासाठी कृषी क्षेत्राचा आणि लघु उद्योगाचा वेगात विकास होण्याची गरज आहे. या दोन क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना अर्थमंत्रालयाने केल्या आहेत. बँकांच्या ठेवीवर परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीत बँकांनी आपल्या शाखांचा वापर करून करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंटमधील ठेवी जास्तीत जास्त प्रमाणात कशा वाढतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या इतर क्षेत्राचा विकासदर खालावला असताना कृषी क्षेत्राचा विकासदर वाढला आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्राला अतिरिक्त भांडवलाची गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर लघुउद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्राला भांडवल पुरवठा वाढल्यानंतर रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होईल असे सांगण्यात आले.





