Cyber Crime: स्क्रीनवर ५ कोटींचा नफा, पण बँक खातं रिकामं; वाकडमध्ये ९५ लाखांचा डिजिटल दरोडा

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला बनावट ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करायला लावून ९५ लाख २० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. ही घटना २५ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अपेक्स अथिना सोसायटी, वाकड येथे घडली.या प्रकरणी राकेश कुमार तिवारी (वय ४६, रा. अपेक्स अथिना सोसायटी, वाकड) यांनी गुरुवारी (दि. २५) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार इंड निव प्रो ॲप्लिकेशन धारक आणि वान्या गिल नावाचे व्हॉट्सॲप खाते वापरणाऱ्या व्यक्तींसह विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून इंड निव प्रो नावाच्या बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग ॲपची माहिती दिली.
त्यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल असे सांगून फिर्यादीकडून ९५ लाख २० हजार रुपये गुंतवून घेतले. ॲपवर ५ कोटी ७६ लाखांचा आभासी नफा दाखवून तो काढण्यासाठी अधिक पैशांची मागणी केली. शेवटी गुंतवलेले पैसे आणि नफा काहीच परत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





