Pawna Dam : पवना धरण 98 टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
पवना धरण (Pawna Dam) सध्या ९८ टक्के भरले असून, पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३.३० वाजल्यापासून धरणातून ८ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Pawna Dam : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पवना धरण (Pawna Dam) सध्या ९८ टक्के भरले असून, पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३.३० वाजल्यापासून धरणातून ८ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वी धरणातून (Pawna Dam) ५,७२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस आणि धरणात वाढणारी आवक लक्षात घेऊन विसर्गात वाढ करण्यात आली. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणातील आवक आणखी वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग १५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे.
विसर्गातील प्रत्येक बदलाची माहिती जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे पवना नदीसह परिसरातील ओढे आणि नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर पवना नदी (Pawna Dam) खोऱ्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.





