शिरूरमध्ये पुन्हा पाचर्णे पवार आमने सामने

न्हावरे: शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातून अखेर माजी आमदार अँड. अशोक पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही वेळापूर्वीच राज्यातील ७७ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शिरुर -हवेली विधानसभा मतदार संघातून माजी आमदार अँड.अशोक पवार यांची अपेक्षेप्रमाणे वर्णी लागली आहे.
शिरूरची लढत प्रमुख भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वीच उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये शिरुर -हवेलीतून विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनाच उमेदवारी जाहीर झाली होती. शिरूरमधून आमदार पाचर्णे विरुद्ध माजी आमदार अँड. पवार अशीच लढत होणार आहे.
गुरुवारी सकाळी शिरुर तहसील येथे आमदार बाबूराव पाचर्णे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यांनतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास माजी आमदार अशोक पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरल्यानंतर दोन्ही बाजूने सभांचे आयोजन करण्यात आले आहे.





