Rohit Pawar – उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी पक्षाच्या घटनेत बदल झाल्याचा खोटा दावा केला होता. पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या हाती अमर्याद अधिकार सोपवण्याच्या एका पूर्वनियोजित कटानुसार त्यांनी हे पाऊल उचलले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या १८ दिवसांतच १६ फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. Ajit pawar plane crash या पत्रात त्यांनी पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्यात आल्याचा खोटा दावा केला आणि सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे सोपवण्यात यावेत, अशी मागणी केली. या संदर्भात ना सुनेत्रा पवार यांना, ना पार्थ पवार यांना विश्वासात घेण्यात आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती केली की, अजित पवार यांच्या निधनानंतरच्या संक्रमण काळात (म्हणजेच सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या कालावधीत) अशा कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाऊ नये. सुनेत्रा पवार यांची २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रोहीत पवारांनी १० मार्च आणि २६ फेब्रुवारी या तारखांची काही कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे पटेल आणि तटकरे यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याचे मानले जाते. या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले होते की, राष्ट्रीय अध्यक्ष अनुपस्थित असताना सर्व अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे असतील आणि सर्व निर्णय त्यांच्याद्वारेच घेतले जातील. त्या पत्राने सर्व अधिकार प्रभावीपणे कार्याध्यक्षामध्ये एकवटले होते, असा दावा त्यांनी केला. तसेच, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची विधाने संशयास्पद असल्याचे रोहित पवार यांनी आरोप केला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नियंत्रण आपल्या हाती घेण्यासाठी काही नेत्यांमध्ये एक पूर्वनियोजित कट शिजला होता. गोयल यांनी सुरुवातीला प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचे प्रतिपादन केले होते, मात्र नंतर आपली ती माहिती चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट केले होते.