‘पतंजली फूड्स’चा शेअर बाजारात धुमाकूळ; 7 दिवसांत 17 टक्के वाढ, 2 बोनस शेअर्सची घोषणा

Patanjali Foods share price: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली फूड्स लिमिटेड या कंपनीने शेअर बाजारात जोरदार कामगिरी केली आहे. सलग पाचव्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून, शुक्रवारी (१८ जुलै २०२५) कंपनीचा शेअर २ टक्क्यांहून अधिक वाढून १,९४४.९० रुपयांवर पोहोचला. मागील सात ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरने तब्बल १७ टक्क्यांची उसळी घेतली आहे.
बोनस शेअर्सची घोषणा –
कंपनीच्या बोर्डाने १७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची शिफारस केली आहे. यानुसार, ज्यांच्याकडे एक शेअर आहे, त्यांना दोन अतिरिक्त शेअर्स विनामूल्य दिले जातील. हा बोनस केवळ रेकॉर्ड डेटला पात्र असलेल्या शेअरहोल्डर्सनाच मिळणार आहे. यास शेअरधारकांची अंतिम मंजुरी अपेक्षित असून, बोनस कंपनीच्या राखीव निधीतून दिला जाणार आहे.
बिझनेस पोझिशन व वाढीची शक्यता –
पतंजली फूड्स सध्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाची ब्रँडेड कुकिंग ऑईल उत्पादक कंपनी आहे. पाम ऑईल उत्पादनात ही कंपनी अव्वल स्थानावर असून, सोया ऑईलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोया प्रोटीनच्या क्षेत्रात ३५-४०% मार्केट शेअर असलेल्या या कंपनीचे या विभागात वर्चस्व आहे. गायीच्या तुपापासून ते मधापर्यंतच्या उत्पादनांमध्येही ही कंपनी आघाडीवर आहे.
पूर्वी रुचि सोया केवळ खाद्यतेल उत्पादनामध्ये सक्रिय होती. मात्र, पतंजली आयुर्वेदकडून एफएमसीजी व्यवसाय खरेदी करून कंपनीने विविध क्षेत्रांत विस्तार केला आहे. त्यामुळे कंपनीचा नफा वाढला असून, व्यवसायिक जोखीम कमी झाली आहे. वित्तीय वर्ष २०२५मध्ये एफएमसीजी विभागाचा वाटा कंपनीच्या एकूण उत्पन्नात ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात हा वाटा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कंपनीचे कार्यक्षेत्र आणि विस्तार
पतंजली फूड्स ही कंपनी तेलबियांपासून खाद्यतेल प्रक्रिया, सोया फूड आणि व्हॅल्यू अॅडेड उत्पादन निर्मिती यामध्ये कार्यरत आहे. शिवाय आता ही कंपनी बिस्किट, हेल्थ प्रॉडक्ट्स आणि न्यूट्रास्युटिकल्ससारख्या एफएमसीजी व एफएमएचजी (Fast Moving Health Goods) क्षेत्रांतही कार्यरत आहे. यामुळे कंपनीच्या व्यवसायात स्थैर्य आणि विविधता निर्माण झाली आहे.





