Patalganga River Flood: तर अंत्यसंस्कार करायचे कुठे? पाताळगंगेच्या पुरानंतर माजगावात निर्माण झाली गंभीर समस्या
Patalganga River Flood: पाताळगंगा नदीच्या महापुरामुळे माजगावची स्मशानभूमी चिखलात; पाऊस थांबूनही अंत्यसंस्काराची जागा वापरण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थ चिंतेत.

Patalganga River Flood – तालुक्यात गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्याचा फटका आता माजगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीलाही बसला आहे. पाताळगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने माजगाव येथील स्मशानभूमी पूर्णपणे विस्कळीत झाल्याने अंत्यसंस्कारासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पूर ओसरल्यानंतरही स्मशानभूमीत चिखलाचे साम्राज्य पसरले असून परिसराची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. नदीच्या पुराचे पाणी थेट स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्याने अंत्यविधीसाठी असलेली जागा पाण्याखाली गेली. पुराचे पाणी ओसरल्यानंतर स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून परिसर वापरण्यायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास अंत्यसंस्कार करणे धोकादायक ठरणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते, शेती आणि सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले आहे.
त्यातच स्मशानभूमीची झालेली दुरवस्था ही ग्रामस्थांसाठी आणखी एक गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः पावसाळ्यात दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्मशानभूमीची तातडीने साफसफाई करून परिसर पूर्ववत करावा, आवश्यक भराव टाकावा तसेच भविष्यात पुराच्या पाण्यापासून संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
“पाताळगंगा नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे माजगाव स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. पाऊस कमी झाल्यानंतर स्मशानभूमीची दुरवस्था निदर्शनास आली आहे. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.”
– संदीप धारणे, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत, माजगाव
“यंदाचा पाऊस अत्यंत भयावक परिस्थितीचा असून याचा फटका शेती रस्ते तसेच माजगाव येथील स्मशानभूमीला देखील बसला आहे. या मार्गातून जाणारा रस्ता आणि स्मशनभूमीच्या पायऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.”
– जयवंत पाटील, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती





