पिंपरी, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी रविवारी (दि.4) शहराच्या विविध भागांत केलेला पूरस्थितीचा घेतलेला आढावा चर्चेचा विषय ठरला.
मात्र. तत्पुर्वी त्यांनी पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकार्यांशी संवाद साधत, त्यांची मते जाणून घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील अगदी मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध सेलच्या पदाधिकार्यांची मते त्यांनी जाणून घेतली.
आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला माजी महापौर मंगला कदम, माजी स्वीकृत सदस्य अॅड. गोरक्षनाथ लोखंडे, झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष संतोष निसर्गंध,
सामाजिक न्याय विभागाच्या महिला शहराध्यक्षा गंगा धेंडे, संजय अवसरमल, संदीपान झोंबाडे, बाळासाहेब बरगले, अशोक भडकुंबे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विजय लोखंडे यांच्यासह पर्यावरण, कामगार, उद्योग व व्यापार, सेवा दल, शिक्षक, कामगार, भटके व विमुक्त सेल आदी सेलचे शहराध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
दोन तास चाललेल्या या बैठकीत पार्थ पवार यांनी सर्व सेलच्या पदाधिकार्यांशी आगामी विधानसभा निवडणकीच्या दृष्टीने चर्चा करत, विविध विषयांवर त्यांची मते जाणून घेतली.
या बैठकीत संतोष निसर्गंध यांनी शहरातील झोपडपट्टयांमधील नागरिकांची कशाप्रकारे हेळसांड होत आहे, याकडे लक्ष वेधले. तर गंगा धेंडे यांनी पक्षाच्या पडझडीनंतरही पक्षासोबत राहणार्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सन्मानजनक पदे दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षवाढीकरिता फायदा होऊ शकतो, असे मत मांडले.
त्यामुळे पार्थ पवार यांचा दौरा महत्वाचा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरदचंद्र पवार गटाच्या वरचष्याने उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे बॅकफूटवर गेल्याचे पहायला मिळाले. मात्र, शरद पवार यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनीदेखील शहरात मेळावा घेत आपली ताकद दाखवून दिली. तर शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आमदार रोहित पवार यांचे शहरातील दौरे गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत.
रोहित पवार धावत्या भेटीतही अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. अजित पवार यांना स्वत:च या टीकेला प्रत्यत्तर द्यावे लागत आहे. तसेच पक्षतील अनेक नेते सोडून गेले असल्याने नव्याने पक्षबांधणीची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार लक्ष घालत असल्याचे सांगितले जात आहे.
पदाधिकार्यांना कामाला लागण्याच्या सूचना
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीच्या हक्काच्या विधासनसभा जागांवर पक्षाची स्थिती आणखी मजबूत कशी होईल, यासाठी पदाधिकार्यांनी प्रयत्न करण्याच्या पार्थ पवार यांनी सूचना दिल्या. तसेच विधानसभा निवडणुकच्या घोषणेची वाट न पाहता आतापासूनच कामाला लागण्याच्या उपस्थित पदाधिकार्यांना सूचना केल्या.