Pune District : अजित पवारांच्या तीनवेळी वेगळ्या भूमिका; रंजन तावरे यांची सडकून टीका

बारामती : लोकसभेला एक, विधानसभेला एक, कारखान्याला वेगळीच भूमिका घेणारे अजित पवार म्हणजे कात न टाकलेला पाच फण्यांचा नागोबा, अशी टीका माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे यांनी केली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक आखाडा चांगलाच तापला आहे. सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून गुरु- शिष्य समजले जाणारे सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे व माजी चेअरमन रंजन तावरे यांच्यासह काही सहकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रंजन तावरे माध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मेळाव्यात केलेल्या भाषणाचा खरपूस समाचार तावरे यांनी घेतला. त्यामुळे छत्रपती कारखान्याप्रमाणे माळेगावमध्ये समझोता होणार असल्याचे संकेत रंजन तावरे यांनी दिले.
यावेळी चंद्रराव तावरे त्यांच्यासह मोठ्या संख्येने उमेदवार तसेच सभासद देखील उपस्थित होते. अजित पवारांची भूमिका माळेगावचे सभासद मान्य करणार नाहीत. विद्यमान संचालकांनी माळेगावची अवस्था अडचणीची करून ठेवली आहे. त्यामुळे माळेगावचा छत्रपती होतोय की काय, अशी भीती सभासदांमध्ये निर्माण झाली आहे. अजित पवार सांगतात, निवडणूक मी पुढे ढकलली. २१ तारखेला मी निवडणूक लावली. याबाबत सविस्तर बोलायचे म्हटलं तर त्यांच्यासाठी अडचणीचे होईल. लोकसभेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली विधानसभेत वेगळी भूमिका घेतली. कारखान्याच्या बाबतीत मात्र आता वेगळी भूमिका घेत आहेत.
३० वर्षांचा संघर्ष ३० मिनिटात संपविला
तावरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून लोकसभा विधानसभा काळात आम्ही 30 वर्षांचा संघर्ष 30 मिनिटात संपविला. असे असताना देखील अजित पवार यांनी कारखान्याबाबत वेगळी भूमिका घेतली. माळेगावचा सभासद वेगळा आहे. त्यामुळे सहकारात आदर्श निर्माण होईल असेच यंदाच्या निवडणुकीत घडेल. आमचं पॅनल हे पक्षविरहित पॅनल आहे. त्यामध्ये आम्ही सर्वांना सामावून घेतले आहे. आम्ही माहितीचा धर्म पाळला अजित पवारांनी तो पाळला नाही. त्यांना सर्वपक्षीय पॅनल म्हणण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.





