Pune Shiv Sena : पुणे शिवसेनेच्या सर्व पदांना स्थगिती! नव्या कार्यकारिणीसाठी होणार मोर्चेबांधणी
Pune Shiv Sena : जिल्हा शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर उदय सामंत यांची फटकेबाजी; समन्वय न दिसल्यास मुख्यमंत्री स्वतः हस्तक्षेप करणार असल्याचे संकेत.

Pune Shiv Sena – महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडल्या, त्यांची पदे काढून घेतलेली नाही. ते सर्वच माझ्याबरोबर व्यासपीठावर असून, आमच्यात गट-तट नाहीत. ज्याचे असतील त्यांनी गट- तट, मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे, असा सल्ला उद्योगमंत्री व शिवसेना नेते डाॅ. उदय सामंत यांनी दिला.
येत्या महिन्याभरात पक्ष संघटना बांधणीवेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसला नाही, तर स्वत: एकनाथ शिंदे त्यावर निर्णय घेतील, असा इशारा देत सामंत यांनी एक महिन्याचा अल्टिमेटमच दिला. पुण्यात शुक्रवारी (दि. ३) उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या वेळी शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, आबा बागुल, संजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुणे शहर आणि जिल्हा स्तरावरील सहसंपर्कप्रमुख, महानगरप्रमुख आणि शहरप्रमुख ही तीन प्रमुख पदे सोडून त्याखालील सर्व पदांना स्थगिती दिली आहे.
नवीन कार्यकारिणीचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले असून, त्यानुसार पुढील महिन्याभरात प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन वाॅर्ड प्रमुखापासून उपशहर प्रमुखापर्यंतची ताकदीचे पदाधिकारी निवडण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
झेपेल असेच प्रश्न विचारा
महायुतीत शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले जाते का, या प्रश्नावर बोलताना सामंत म्हणाले, की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना स्वत:चे कर्तृत्व दाखवून दिले आहे. शिवसेना कोणत्याही टार्गेटला जुमानत नाही. अवकाळीमुळे शहरातील परिस्थितीवर धंगेकर काहीच बोलले नाहीत, यावर धंगेकर अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करतात. ते अभ्यास करून उद्या आवाज उठवतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद निवड आणि रोहित टिळक यांच्याबाबत विचारणा केली असता, माझ्या तब्येतीला झेपेल असेच प्रश्न विचारा, असे ते म्हणाले.





