निमोणे : शिरूर तालुक्यातील पारोडी येथील कुणाल अण्णा कवितके या शेतकरी कुटुंबातील युवकाने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने महसूल सहाय्यक या प्रतिष्ठित पदाला गवसणी घालत गावाचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. कुणाल हा शेतकरी कुटुंबातील मुलगा असून, त्याचे वडील पारोडी गावचे प्रगतशील बागायतदार म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. जिद्द, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर कुणालने ३० एप्रिल २०२३ रोजी झालेल्या या परीक्षेत यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे गावकऱ्यांनी फटाके वाजवून, मिठाई वाटून आणि जल्लोष करून आनंद साजरा केला. कुणालने आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि मित्रमंडळींच्या सततच्या पाठिंब्याला दिले आहे. त्याच्या या यशाने परिसरातील अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्यात नवचेतना निर्माण झाली आहे. कुणालच्या या यशस्वी वाटचालीमुळे पारोडी गावाचा गौरव वाढला आहे.