parliament session 2025 : संसदेत आपरेशन सिंदूरवर पुढच्या आठवड्यात चर्चा; सरकारची तयारी

parliament monsoon session 2025 – ऑपरेशन सिंदूरवर पुढील आठवड्यात लोकसभेत १६ तास तर राज्यसभेत ९ तास चर्चा होईल. सोमवारी लोकसभेत तर मंगळवारी राज्यसभेत चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ तारखेला म्हणजे मंगळवारी राज्यसभेत या विषयावर माहिती देतील. संसदेत दर आठवड्याला एक चर्चा सत्र आयोजित करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून लावून धरण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीमुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरची चर्चा काल म्हणजेच मंगळवारी होऊ शकली नाही. कालच्या तहकूबीबाबत विरोधी पक्षांनी म्हटले आहे की, व्यवहार सल्लागार समितीची बैठक वारंवार रद्द करणे योग्य नाही.
आता सभागृहाची बैठक गुरुवारी होणार आहे, ज्यामध्ये निवृत्त खासदारांना निरोप दिला जाईल. काही विरोधी खासदारांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना निरोप देण्यासाठी सभागृहात चर्चेची मागणीही केली, जी सत्ताधारी पक्षाने मान्य केली नाही.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीसाठी सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे दावे, बिहारमधील मतदार यादीची विशेष पडताळणी आणि इतर काही प्रमुख मुद्द्यांवर पंतप्रधानांनी प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी विरोधी आघाडीची इच्छा आहे.
संसद भवन संकुलात विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत सरकारवर या मुद्द्यांवर दबाव आणण्याचा हा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, द्रमुकचे टीआर बालू आणि इतर अनेक पक्षांचे नेते या बैठकीत उपस्थित होते.





