Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा गोंधळात शुभारंभ ; घोषणाबाजीमुळे लोकसभा 12 वाजेपर्यंत तहकूब
Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला.

Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीमुळे प्रश्नोत्तराचा तास विस्कळीत झाला आणि अखेर सभापती ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केले.
अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनी सभागृहाच्या माजी सदस्यांच्या निधनाची माहिती सभागृहाला दिली. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळण्यात आले. (Parliament Monsoon Session)
दरम्यान, राज्यसभेचे कामकाजही सुरू झाले असून नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली.
लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी सदस्यांनी अयोध्या राम मंदिरासाठीच्या देणगी चोरीच्या कथित प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. अनेक सदस्य वेलमध्ये उतरले आणि फलक फडकवत सरकारविरोधात घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे सभागृहातील कामकाज ठप्प झाले.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at the Parliament for the #ParliamentMonsoonSession
(Source: DD) pic.twitter.com/QUd7Wx3fdr
— ANI (@ANI) July 20, 2026
सततच्या गदारोळामुळे सभापती ओम बिरला यांनी विरोधी सदस्यांना शांत राहून सभागृहाच्या परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले. “फलक फडकवणे ही सभागृहाची परंपरा नाही. प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याची पुरेशी संधी दिली जाईल. तुम्हाला चर्चा नको आहे आणि सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नाही,” असे सांगत त्यांनी विरोधकांना शांत होण्याचे आवाहन केले. (Parliament Monsoon Session)
मात्र, सभापतींच्या आवाहनानंतरही विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अखेर लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या गदारोळामुळे पुढील कामकाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





