Parliament Monsoon Session 2025 : “ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानीच” – अमित शहा

Parliament Monsoon Session 2025 – जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सुरक्षा दलांनी ठार मारल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेत दिली. ऑपरेशन महादेव अंतर्गत, लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तीन धोकादायक दहशतवाद्यांना ठार मारले. त्यापैकी एक लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर होता असे शहा यांनी सांगितले.
शहा यांनी लोकसभेत सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे सुलेमान, अफगाणी आणि जिब्रान आहेत. हे तिघेही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते आणि त्यांचा ए-लिस्ट दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होता. पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमान होता. बैसरन खोऱ्यात आमच्या नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेले तिघेही आता मारले गेले आहेत. गृहमंत्र्यांनी या यशस्वी कारवाईसाठी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले.
त्यांनी सांगितले की पहलगाम हल्ल्यानंतर काही तासांनी ते स्वतः श्रीनगरला पोहोचले आणि सलग दोन दिवस सुरक्षा आढावा बैठका घेतल्या. २२ मे रोजी गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळाली की हे दहशतवादी दाचीगाम परिसरात लपले आहेत.
त्यानंतर आयबी आणि लष्कराने दहशतवाद्यांच्या संभाषणाचा मागोवा घेण्यासाठी विशेष मशीनचा वापर केला. २२ जुलै रोजी दहशतवादी या भागात असल्याची पुष्टी झाली. त्यानंतर सैन्य, सीआरपीएफ आणि पोलिसांनी एकत्रितपणे कारवाई सुरू केली आणि तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले.
दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर त्यांची ओळख पटविण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली. या दहशतवाद्यांना लपवणाऱ्या लोकांना आधीच अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणले तेव्हा अटक केलेल्या लोकांना त्यांची ओळख पटवण्यास सांगण्यात आले.
याशिवाय, दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या रायफल्स, एक एम ९ आणि दोन एके-४७, चंदीगडमधील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या. तिथे त्याच रायफलमधून गोळीबार करून बुलेट शेल्स काढले गेले आणि त्यांची तुलना पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाहून सापडलेल्या गोळ्यांशी करण्यात आली. दोन्ही गोळ्या जुळल्या.
अमित शाह म्हणाले की, दहशतवाद्यांकडून जप्त केलेली शस्त्रे पहलगाममध्ये वापरण्यात आलेली होती याची १०० टक्के पुष्टी झाली आहे. ते म्हणाले की, हे तीन दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचे ठोस पुरावे आहेत. दोन दहशतवाद्यांचे पाकिस्तानी मतदार ओळखपत्र क्रमांक सापडले आहेत आणि त्यांच्याकडून पाकिस्तानात बनवलेले चॉकलेट देखील जप्त करण्यात आले आहेत.
चिदंबरम यांच्यावर निशाणा
माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधत शहा म्हणाले की चिदंबरम दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. संपूर्ण देश आणि जगाला माहित आहे की हे पाकिस्तानी होते, तरीही काही लोक पाकिस्तानचा बचाव करत आहेत. हे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहे.





