Modi-Shah : “जोडी स्वतःच्याच बढायांच्या जाळ्यात अडकली आहे…”; संसद अधिवेशनाच्या सस्पेन्सवरून काँग्रेसची ‘मोदी-शाह’ यांच्यावर टीका
ही जोडी अद्याप एकत्र आहे असे गृहीत धरल्यास, त्यांच्याकडून नेमका कोणता खेळ खेळला जात आहे? आतापर्यंत देशाला संसदेचे हिवाळी अधिवेशन कधी होणार आहे, हे समजायला हवे होते.

Modi-Shah – संसद अधिवेशनाबाबत कायम असलेला सस्पेन्स पाहता, पंतप्रधान-गृहमंत्री जोडी स्वतःच्याच बढायांच्या जाळ्यात अडकली आहे किंवा पडद्यामागे काहीतरी अत्यंत भयंकर शिजत आहे, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला आहे. या दोन्ही शक्यतांमध्ये ही जोडी पूर्णपणे उघडी पडली असून, त्यांच्या या राजकारणामुळे संसदेसारख्या संस्थेची प्रतिष्ठा खालावत असल्याची टीकाही विरोधी पक्षाने केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम प्रभारी जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्यावर निशाणा साधला. ही जोडी अद्याप एकत्र आहे असे गृहीत धरल्यास, त्यांच्याकडून नेमका कोणता खेळ खेळला जात आहे? आतापर्यंत देशाला संसदेचे हिवाळी अधिवेशन कधी होणार आहे, हे समजायला हवे होते.
तसेच अद्याप संस्थगित न झालेले पावसाळी अधिवेशन पुन्हा कधी बोलावले जाणार आहे, हेही देशाला कळायला हवे होते. लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत जमवण्यासाठी या जोडीने केलेले केविलवाणे प्रयत्न देशाने पाहिले आहेत. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेसाठी मोदी-शहा यांचा नेमका फॉर्म्युला काय आहे, हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जीटीए-६ या व्हिडिओ गेमचा संदर्भ देत, या जोडीच्या कारस्थानांमुळे आधीच कमकुवत झालेल्या संसदेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन १०० दिवस उलटले असले तरी, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह अद्याप लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताच्या शोधात आहेत, अशी टीका काँग्रेसने शनिवारी केली होती.
विकसित भारतचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण लागू करून लोकसभेची सध्याची सदस्यसंख्या आणि राज्यनिहाय रचना कायम ठेवणेच देशाच्या हिताचे आहे, असे मतही रमेश यांनी व्यक्त केले होते.






