Judicial officers working : ‘चेंबरमध्ये बसून कॉफी पिण्यापेक्षा कोर्टात काम करा’; न्यायिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
बाहेर लोक रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असतात, पण हे अधिकारी त्या प्रकरणांवर सुनावणी घेत नाहीत, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

Judicial officers working – सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांसाठी वारंवार न्यायालयात धाव घेणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायिक अधिकाऱ्यांची कामाच्या वेळेत होणारी अनुपस्थिती आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले.
केरळमधील जिल्हा न्यायाधीशांच्या थेट भरती कोट्याशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने ही निरीक्षणे नोंदवली.
यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत तोंडी म्हणाले की, ते (न्यायिक अधिकारी) आता खूपच बोलू लागले आहेत. प्रत्येक प्रकरणात आम्हाला हे द्या, ते द्या असे अर्ज करत आहेत. ते न्यायालयात काम का करत नाहीत? त्यांच्या खटल्यांच्या निकालांचे प्रमाण काय आहे आणि ते दिवसभर काय करतात, हे आम्हाला माहीत आहे.
कामाच्या वेळेत न्यायिक अधिकारी न्यायालयात उपस्थित नसल्याबद्दलही सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केले. तुम्ही सकाळी १० वाजता कोर्टात जा, तिथे कोणीही नसते. ते चेंबरमध्ये बसून कॉफी पीत असतात. जणू काही तिथे काय चालले आहे, याची आम्हाला कल्पनाच नाही, अशा शब्दांत त्यांनी फटकारले.
ते २४ तास फक्त आपल्याला कोणते भत्ते आणि सेवाविषयक लाभ मिळत आहेत, आपले निवृत्तीचे वय वाढवले जात आहे की नाही, याचाच विचार करत असतात.
बाहेर लोक रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असतात, पण हे अधिकारी त्या प्रकरणांवर सुनावणी घेत नाहीत, असेही सरन्यायाधीश म्हणाले. सेवानिवृत्तीचे वय, भत्ते आणि इतर सुविधांबाबत वारंवार मागण्या करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.






